
अलिबाग : प्रतिनिधी
शून्य प्रलाम्बिता (झीरो पेंडंसी) कार्यपद्धत ही चांगली संकल्पना आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचार्यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पडले पाहिजे. जनतेची कामे वेळेत पूर्ण करून चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्यांचे कर्तव्य आहे, असे मत भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी येथे व्यक्त केले. रायगड जिल्हा परिषदेतर्फे झीरो पेंडंसी व डेली डिस्पोजल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत चंद्रकांत दळवी बोलत होते. रायगड मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, प्रांताधिकारी शारदा पोवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्यासह सर्व विभागाचे मुख्य अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. शुन्य प्रलंबितता राबविण्यासाठी कामाचे टप्पे करावेत. पहिल्या टप्प्यात सर्व अधिकार्यांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्चित करून त्यांचा निपटारा करावा. त्यासाठी सिक्स बंडल पद्धत, लिपीक दप्तरातील नोंदवही अद्ययावत करणे, ए. बी. सी. आणि डी. पद्धतीची यादी तयार करणे, अभिलेख कक्ष आदर्श करणे या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे दळवी या वेळी म्हणाले. रेकॉर्ड मॅनेजमेंटची सुयोग्य पद्धत नसल्याने आज ग्रामपंचायत नमुन्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शुन्य प्रलंबितता व दैनंदिन निर्गती होणे गरजेचे आहे, असे मत दिलीप हळदे यांनी व्यक्त केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper