Breaking News

जबाबदारीचे भान ठेवा

पुलवामा हत्याकांड आणि त्यानंतर भारताने घेतलेला बदला यामुळे पाकिस्तानबरोबरचे संबंध चिघळले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापरही काळजीपूर्वक करा. शत्रूराष्ट्राला कोणत्याही प्रकारची माहिती पुरवू नका अन्यथा त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील.

पुलवामा हत्याकांडाचा बदला घेतल्यानंतर भारताची विश्वातील प्रतिमा आणखी उजळली असून, देशातील जनतेला जिगरबाज भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचा सार्थ अभिमान वाटू लागला आहे. अर्थात शौर्याची ही परंपरा आपले बहाद्दर शूर सैनिक प्राणपणाने जपत आलेले आहेत. ज्या वेळी परचक्र येते त्या वेळी प्रत्येक स्वाभिमानी भारतीय आपापसातील मतभेद बाजूला ठेवत केवळ देशासाठी एकत्र होतो हे या वेळीही प्रकर्षाने दिसून आलेले आहे. कारण पुलवामात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हत्याकांड केल्यानंतर त्याचा बदला घ्यावा, असे प्रत्येक भारतीयाला वाटत होते. ते ओळखून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा बदला कशाप्रकारे घ्यायचा, कुठे घ्यायचा आणि कधी घ्यायचा हे सैन्याने ठरवावे असे जाहीर करून सैन्याला एकप्रकारे मोकळीकच दिली होती. त्यानुसार भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाने एकत्रित निर्णय घेत हवाई हल्ल्याची जोरदार तयारी करीत 27 फेब्रुवारीला पाक व्याप्त काश्मिरात थेट कारवाई करीत जैश या अतिरेकी संघटनेचे अड्डेच उद्ध्वस्थ करून टाकले आहेत. याचा धसका पाकने इतका घेतला की भारत कोणत्याही क्षणी आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करू शकतो असा कांगावा आता पाकने केला आहे, पण भारताने यापूर्वीही आम्ही प्रथम कोणत्याही प्रकारची कारवाई करू इच्छित नाही, मात्र आमची आगळीक काढल्यास पाकला सोडणार नाही, असा सज्जड दमच भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. यामुळे आता तरी पाक नीट वागेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. देशातील नागरिकांनीही यापुढे सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण पुलवामाच्या बदल्यानंतर सोशल मीडियावरून विविध प्रकारचे संदेश पाठविले जात आहेत. सोशल मीडियावर सध्या अनेक जोक्स, मिम्स व्हायरल होत आहेत, परंतु जरा थांबा, देशाचा आणि लष्कराचा विचार करा. आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि इंस्ट्राग्रामवरून शेअर करत असलेले मेसेज काही क्षणांतच शत्रूराष्ट्रांपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे जर तुमचा मित्र सैन्यात असेल, तर त्यासंबंधीचे फोटो, व्हिडीओ किंवा त्याची माहिती देणारे कोणतेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करू नका. स्थानिक अथवा राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील कोणतेही फोटो, व्हिडीओ किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नका. भारतीय जवान किंवा सैन्यातील सामग्रीसोबतचे सेल्फीही शेअर करू नका. शत्रूराष्ट्रांकडून भारतीय सोशल मीडियाचे मॉनिटरिंग करण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील सोशल मीडियावर शत्रूराष्ट्राची नजर आहे.  भारतीय विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा सरकारी कार्यालयाचे फोटो शेअर करू नका. भारतीय जवानांसदर्भातील सेन्सेटिव्ह असा कुठलाही व्हिडीओ ग्रुपवर शेअर करू नका आणि तसं करणार्‍यांनाही बजावून ठेवा. स्वतः सतर्क राहा आणि काहीही अनुचित प्रकार होत असल्याची कुणकुण लागताच, स्थानिक सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधा. ही नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे हे लक्षात ठेवा. उतावीळपणे काहीही करून फसू नका.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply