अलिबाग ः प्रतिनिधी
उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात सुरू असलेल्या 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत अलिबागमधील सचिन पाटीलने फिटनेस फिजीक प्रकारात चौथा क्रमांक मिळवला. कोरोनामुळे जागतिक स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता असल्याने काही खेळाडूंनी तयारी केली नव्हती. सचिन पाटीलने मात्र सर्वस्व पणाला लावत स्पर्धेच्या तयारीत स्वत:ला झोकून दिले होते. अवघ्या तीन महिन्यांत सचिनने फिटनेस फिजीक गटासाठी स्वत:ला तयार केले. भारताने या स्पर्धेसाठी 77 खेळाडूंची निवड केली होती. त्यात सचिन पाटीलचा समावेश होता.
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत : खेळणार्या सचिन पाटीलने फिटनेस फिजीक प्रकारात चांगली कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. सचिनने या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. सचिन मूळचा अलिबाग तालुक्यातील वायशेत गावचा आहे. ग्रामीण भागातील असूनही त्याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेची तयारी करण्यास मला फारच कमी वेळ मिळाला. स्पर्धेत मला पदक मिळाले नाही, तरी मी चौथ्या क्रमाकांपर्यंत पोहचलो याचे मला समाधान आहे. या स्पर्धेतून मला बरेच काही शिकता आले, अनुभव मिळाला. त्याचा मला पुढील स्पर्धांमध्ये फायदा होईल. अजून माझ्या दोन स्पर्धा बाकी आहेत. त्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या देशासाठी पदक मिळवेन.
-सचिन पाटील
RamPrahar – The Panvel Daily Paper