Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीतून धुराचे लोट

वडखळसह पेण परिसरातील नागरिक भयभीत

पेण : प्रतिनिधी
डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतून बुधवारी (दि. 29) सकाळपासून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता. हा धूळमिश्रीत धूर असल्याने वडखळ, पेण परिसरात दाट लोट पसरले होते. साधारण लालसर रंगाच्या या धुरामुळे पेणकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियात त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभर पसरली.
जेएसडब्ल्यू कंपनीच्या एका प्लांटमधून धूळमिश्रित धुराचे लोट बाहेर पडत होते. हे लोट कंपनी परिसरातील वडखळ येथून हवेमुळे पेणपर्यंत पोहोचले. दाट पसरलेल्या धुरामुळे समोरचे दिसेनासे झाले होते. लालसर रंगाच्या प्रचंड धुराने डोलवी, गडब, करावी, कासू, आमटेम, नवेगाव परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना असह्य झाले. नेमके काय झाले आहे, याबाबत काहीही माहिती नसल्याने लोकांमध्ये अधिकच गोंधळ व भीती निर्माण झाली होती. सोशल मीडियाद्वारे एकमेकांना संदेश पाठवून काळजी घेण्याचे आवाहन पेणकरांकडून करण्यात येत होते.
दरम्यान, जेएसडब्ल्यू कंपनीतील एक प्लांटमधील स्वीच ऑफ झाल्याने चिमणीमधून धुळीचे लोट उठल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली असल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी स्पष्ट केले तसेच परिस्थिती नियंत्रणात असून, काम सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीचे स्पष्टीकरण
कंपनीमध्ये कोणतीही दुर्घटना घडलेली नसून सकाळी 11 ते 11.30च्या सुमारास कंपनीतील कोक ओव्हन प्लांटमध्ये अचानक शटडाऊन झाल्याने मोठ्या प्रमाणात चिमणीमधून धूरासह डस्ट बाहेर पडली. त्यामुळे कंपनी परिसरात धुळीचे लोट उठले होते. हा विषारी वायू नाही तसेच प्लांट पूर्ववत सुरू झाल्याची माहिती जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी आत्माराम बेटकेकर यांनी दिली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply