कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतकरी, कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक नारायण ज्ञानदेव तथा एन. डी. पाटील यांचे सोमवारी (दि. 17) कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी (दि. 18) कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार) मैदानावर सकाळी 8 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. करोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही.त्यानंतर दुपारी 1च्या सुमारास बावडा स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. करोनाच्या दुसर्या लाटेत त्यांना करोनाचा संसर्गदेखील झाला होता, परंतु या वयात देखील त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले. एन. डी. पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. करोनाच्या नियमांमुळे केवळ 20 जणांच्या अर्थात कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे,
मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये, तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई ऊर्फ माई पाटील व कुटुंबीयांनी केले आहे.
दरम्यान, कदमवाडी येथील अॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी अंत्यदर्शन घेतले.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातील एक मोठे नाव इतिहासजमा झाले आहे. कोणाचीही भीडभाड न ठेवता सामान्य माणसासाठी पोटतिडकीने लढणारा नेता आपण गमावला असून त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे. एन. डी. पाटील म्हणजे अन्यायाच्या विरोधात संघर्ष अशी स्थिती होती. संघर्षाला पर्यायी शब्द एन. डी. पाटील होते. कोल्हापूर टोलसारखे मोठमोठे विषय मार्गी लावणारे आणि सर्वसामान्य माणसांसाठी लढणारे एक मोठे नेतृत्व एन. डी. पाटील यांच्या निधनाने गमावले आहे. त्यांच्या संघर्षाचा वसा तरुण पिढीने पुढे चालविला पाहिजे.
-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
एका तपस्वी नेत्याचे निधन…
एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची बातमी आली. एक अतिशय तपस्वी वृत्तीचा नेता, कोणालाही कधीही न घाबरता आपल्या मनामध्ये जे आहे ते बोलणारा नेता, गोरगरिबांची सर्व वर्गातील लोकांची कणव असलेला नेता आज वयाच्या 93व्या वर्षी आपल्यातून गेला. याचे अतिशय दुःख होत आहे. माझा त्यांचा परिचय 40-45 वर्षाचा आहे.
माझे सासरे जनार्दन भगत, त्या वेळचे आमचे नेते दि. बा. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करीत होतो. त्या वेळी एन. डी. पाटील साहेब कापड गल्लीतील छोट्याशा कार्यालयात व गव्हाण गावात येत असत. आमच्या सासर्यांकडे, आमच्या भागात येत असत. 1967च्या दुष्काळापासून त्यांना मी जवळून ओळखतो. तेव्हापासूनचे सुरू असलेले त्यांचे कामाचे व्रत आज शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. कधीही त्यांनी आजारपणाची तमा बाळगलेली नाही.
रयत शिक्षण संस्थेचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. मला त्यांच्या हाताखाली शेकापत आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला अतिशय प्रेम दिले. इतके प्रेम दिले की मी त्यांचा आवडता शिष्य होतो, असे म्हणायला हरकत नाही. मी पक्ष सोडून गेलो तरी त्यांचे प्रेम कमी झाले नाही. त्यांचे प्रेम माणसाच्या कामावर होते. त्यामुळेच त्यांनी मला काय करतोस असे न विचारता कोठेही मी गेलो तरी माझ्यावर प्रेम केले. त्यादृष्टीने माझा एक आवडता नेता असे एन. डी. पाटील यांच्याप्रति माझे मत आहे. मी कोणत्याही पक्षात असलो तरी माझा सगळ्यात जवळचा व आवडता नेता म्हणून फक्त एन. डी. पाटीलच आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच मी माझ्या जीवनात वाटचाल करीत आहे, असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
प्रा. एन. डी. पाटील हे प्रदीर्घकाळ शेकापचे सरचिटणीस आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. दोन्ही ठिकाणी काम करीत असताना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली. कोणत्याही आंदोलनात उतरताना समाजासाठी त्यांनी आपली पूर्ण ताकद वापरली आणि शेवटच्या निकालापर्यंत ते कायम लढत राहिले. महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला तर शेतकरी आणि सामान्य माणसासाठी ते त्या अन्यायाविरोधात कायमच उभे राहिले. ओघवती वक्तृत्व शैली आणि सर्वसामान्यांचा कैवार घेण्याची उपजत प्रवृत्ती यामुळे ते महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे आशास्थान बनले होते. आपल्या सर्व आयुष्यात त्यांनी सर्व लढे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि अखंडपणे लढले.
-आमदार प्रशांत ठाकूरशेतकरी कामगार पक्षाचे माजी सरचिटणीस आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब यांचे निधन झाल्यामुळे महाराष्ट्राची मुलूखमैदान तोफ शांत झाली आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणी आणि भल्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत, तसेच लोकशाही चळवळी जिवंत राहाव्यात, सामान्य शेतकरी, कामगार यांना चांगले दिवस यावेत यासाठी त्यांनी संपूर्ण जीवनभर खस्ता खाल्ल्या. आशा एन. डी. पाटील यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीला मोठे नुकसान झाले आहे. ही चळवळ पुढे टिकावी यासाठी तरुणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper