संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त – खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालया समोर आणि बालभारती जवळ झोपडपट्टी आहे. लॉकडाऊन असल्याने याठिकाणी राहणार्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी संबंधित झोपडपट्टी धारकांची जेवणाची व्यवस्था करावी, अशी महत्वपूर्ण मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शनिवारी पनवेल मनपाच्या अन्नछत्रातून संबंधितांना अन्नवाटप करण्यात आले. त्यामुळे येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
खांदा वसाहतीत सीकेटी महाविद्यालयाच्या समोर आणि बालभारती च्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून गरीब लोक झोपड्यात राहतात. बिगारी काम करून जे पैसे मिळतील ते त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. काहीजण कचरा वेचून पोटाची खळगी भरतात. दरम्यान आता लॉकडाऊन सुरू असल्याने या गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेला निवेदन दिले होते. खांदा वसाहतीत सेक्टर 12 येथील झोपडपट्टीवासियांना मोफत जेवण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. महापालिका प्रशासनाने शनिवारपासून याठिकाणी
जेवण पाठवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे पदाधिकारी भीमराव पोवार यांच्यासह मनपाच्या कर्मचार्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून येथील गरीब कुटुंबांना जेवण दिले.
याबद्दल झोपडपट्टीतील रहिवाशांनी सभापती संजय भोपी, भीमराव पोवार आणि पनवेल महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहे. संबंधितांना अन्न क्षेत्रातून नियमित जेवण मिळेल असा आशावाद संजय भोपी यांनी व्यक्त केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper