मुंबई : प्रतिनिधी
‘ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे, तिथे निर्बंध कडक राहतात. रेस्टॉरण्ट, बारवरील निर्बंध त्याच धर्तीवर शिथिल करण्यात आले आहेत आणि वाटा न देऊ शकणारे मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धूप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत,’ असा गंभीर आरोप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. जे लोक वाटाघाटी करू शकत नाहीत, त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत सुद्धा शिवसेना वाटघाटी करणार का, असा सवाल त्यांनी केला. राज्यातले थिएटर सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या एका राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्या वतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करू, असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या खासदाराच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करू, असा इशाराही शेलार यांनी दिला. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजप आहे, पण वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय, केंद्राच्या पत्रात बार, पबचा उल्लेख आहे का? केंद्राने सांगितल्याप्रमाणे कोरोना टेस्ट वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे का लपवले? जालन्याला जास्त लसी का गेल्या? आरोग्य सेवकांचे लसीकरण अद्यापही का झालेले नाही. सोयीचे राजकारण करू नका, असे शेलारांनी सुनावले.
…तर मंदिरे बळजबरीने उघडावी लागतील!; चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे उघडली नाहीत, तर बळजबरीने उघडावी लागतील, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. चंद्रकांत पाटील सध्या अमरावतीच्या दौर्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, सरकार विचार करताना काय विचार करते माहीत नाही, दारूची दुकाने उघडी आहे, बिअर बार उघडे आहेत, कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाहीये. त्या ठिकाणी कसलेही निर्बंध नाहीत, पण मंदिरांमध्ये मात्र सोशल डिस्टन्सिंग होणार नाही असे वाटते हा जो गैरसमज आहे तो काढून टाकला पाहिजे. भाविकांना मंदिरातून ऊर्जा मिळते, फक्त महाराष्ट्रच असे राज्य आहे जिथे मंदिर बंदच आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper