मुंबई ः प्रतिनिधी
ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही, हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला. परिणामी या आमदारांनी सरकारविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे सरकारवर नाराज आहेत. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करीत आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत. निधी वाटप समान पद्धतीनेच झाले पाहिजे. आम्ही काँग्रेस नेतृत्वाकडे आमची नाराजी व्यक्त केली, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमधील 11 आमदार नाराज असून आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आमदार कैलास गोरंट्याल
यांनी दिली. याबाबतची तक्रार आम्ही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्य सरकारसमोरचे विघ्न वाढले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्त्व दिले जात असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत भेट घेतली होती, मात्र त्यांना ठाकरे यांनी लवकर भेट दिली नसल्याने काँग्रेसमध्ये आणखीनच अस्वस्थता पसरली होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काँग्रेस नेते बॅकफूटवर गेले होते. त्यानंतर न विचारताच अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याचा आक्षेप घेत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांना काँग्रेस नेत्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागली होती. आता थेट काँग्रेसच्या 11 आमदारांनी निधी वाटपावर असमाधान व्यक्त करीत नाराजी दर्शविल्याने ठाकरे सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper