‘साहित्यसंपदा’ची अभिनव कल्पना

अलिबाग : रामप्रहर वृत्त
मराठी संस्कृतीत दिवाळी एक चैतन्याचा सण. मराठी माणसाच्या मनात दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील यासह दिवाळी अंक असे समीकरण ठाम रअसते. दिवाळी विशेषांक नेहमीच आपले वेगळे असे स्थान साहित्यक्षेत्रात राखून आहेत. खूप आवडीने आणलेला विशेषांक नंतर कुठेतरी पडून राहतो आणि वर्षाच्या शेवटाला त्याची रद्दीत रवानगी होते. या बाबींचा विचार करून संस्थापक वैभव धनावडे, समूह अध्यक्षा नमिता जोशी, समूहप्रशासक प्रतीक धनावडे, वैशाली कदम, रायगडमधील साहित्यिक पत्रकार रमेश धनावडे आणि समूहसदस्य जीविता पाटील, रवींद्र सोनावणे यांनी दिवाळी अंकांचे स्वरूप बदलून तो कायम संग्रहित कसा राहील, कोणीही कुठूनही आणि कधीही तो कसा वाचू शकेल याबाबत चर्चा होऊन दिवाळी अंकाला नवे स्वरूप प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साहित्यसंपदा डिजिटल पर्व या संकल्पनेतून या दिवाळी अंकातील साहित्य दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्याचे ठरले. या माध्यमातून लोखक आणि कवी यांचे साहित्य त्यांच्याच आवाजात रसिकांना ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे. या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्य मागविण्यात येऊन त्याचे सादरकरणाचे छायाचित्रण नुकतेच कामोठे येथील पी.आर. स्टुडिओ 2.ओ येथे झी मराठी वाहिनीवरील सुप्रिसद्ध मालिका अलटी पलटी फेम संगीतकार कुणाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या वेळी लालसिंग वैराट, रसिका लोके, किसन पेडणेकर, आरुशी अद्वैत, अश्विनी वराळे, श्रीकांत पेटकर, संतोष सकपाळ, शारदा खेडकर, मनीष चांदले, सलोनी बोरकर, श्रेयस रोडे, ऋचा निलिमा यांच्या साहित्याचे छायाचित्रण झाले. रायगडमधील दिलीप मोकल, सिद्धी गुंड आणि गजलकार संदीप बोडके यांची विशेष उपस्थिती होती. गोवा येथून आसावरी कुलकर्णी, सोलापूर येथील सुप्रसिद्ध कवी वकील कैलास नाईक, ठाण्यातील प्राजक्ता बोवलेकर, भांडुप येथील संजय कदम, मुंबईतील किरण बोरकर, पुण्याहून शंतनु पुराणिक, तब्बसूम शेख, काशीद, नांदेडहून रंजना हंबर्डे यांनी आपला अप्रत्यक्ष सहभाग साहित्य पाठवून नोंदवला. समूहातील लेखकांच्या प्रकाशित पुस्तकांचे परीक्षण अद्वैत दाते यांनी सादर केले. ज्येष्ठ साहित्यिक गझलकार आणि मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ए. के. शेख यांच्या गजलेचा समावेशसुद्धा ह्या डिजिटल पर्वात करणात आला आहे. कथा, कविता, चारोळ्या, गजल अशा विविध प्रकारे मनोरंजन करताना साहित्याची जोपासना करणार्या साहित्यसंपदा समूहाच्या डिजिटल पर्वाची सुरुवात म्हणजे दिवाळी अंकाचे काळानुरूप बदलते स्वरूप असे म्हणणे योग्य ठरेल, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया समाजात उमटत आहे. लवकरच या दिवाळी डिजिटल पर्वाच्या सीडीचे प्रकाशन अलिबाग येथे होईल, असे या उपक्रमाचे नियोजक मनोमय मीडिया यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper