Breaking News

डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक; ज्येष्ठ डॉ. गोविंद गुणे यांचे निधन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे यांचे वडील आणि ज्येष्ठ डॉ. गोविंद रंगनाथ गुणे यांचे गुरुवारी (दि. 13) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. कोरोना निर्बंध असल्याने मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत उत्तररात्री अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुग्णसेवा हा व्यवसाय नसून ती मनुष्यसेवा आहे हा विचार डॉ. गोविंद गुणे यांनी रूजविला. तोच संस्कार त्यांनी सुपुत्र डॉ. गिरीश गुणे यांनादेखील दिला. म्हणूनच डॉ. गुणे पितापुत्रांना गरीब रुग्णांचे देव म्हणून संबोधले जाते. डॉ. गोविंद गुणे यांचा जन्म 29 सप्टेंबर 1933 रोजी पंढरपूर येथे झाला. मुंबईमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत त्यांनी डीएसएफ पदवी प्राप्त केली. 1956 साली ते रायगडात आले. 1956 ते 58 अशी सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी पेण तालुक्यातील वावोशी येथे सरकारी रुग्णालयात प्रॅक्टीस केली. त्यानंतर 1958 ते 2012पर्यंत पनवेलमध्ये त्यांनी गरीब, गरजू रुग्णांची सेवा केली. अत्यल्प शुल्क तेसुद्धा असल्यास द्यावे अशा वृत्तीने ते जनसेवा करायचे.
रुग्णसेवेसोबतच रोटरी क्लबच्या माध्यमातून डॉ. गोविंद गुणे यांनी समाजसेवा केली. ज्या समाजात आपण अर्थार्जन करतो त्या समाजाचे आपण ऋण फेडले पाहिजे या भूमिकेतून रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांना ते भरभरून देणग्या देत असत. रायगड जिल्ह्यातील पहिले पीएचएफ डोनर म्हणून त्यांनी सन्मान मिळविला होता. ते रायगड मेडिकल असोसिएशनचे आजीव सभासद होते. आज दिमाखात उभ्या असलेल्या आणि रुग्णसेवेमध्ये अखंडपणे वाहून घेतलेल्या गुणे हॉस्पिटलचे ते संस्थापक होय. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
डॉ. गोविंद गुणे यांच्या निधनाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आपण सर्वांनी निर्बंध पाळले पाहिजेत. त्यामुळे सांत्वनासाठी आमची व्यक्तिशः भेट घेणे टाळावे, असे आवाहन डॉ. गिरीश गुणे यांनी समस्त जनतेला केले आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply