Breaking News

ढिसाळ आरोग्य यंत्रणेने घेतला महिलेचा बळी; संतप्त कुटुंबीयांची पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक; कारवाईची मागणी

पाली : प्रतिनिधी

रुग्णवाहिका व त्यातील डॉक्टर वेळीच उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मंगळवारी पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या मयत महिलेच्या कुटुंबियांनी मंगळवारी (दि. 17) या आरोग्य केंद्रावर धडक दिली आणि याप्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील अश्विनी अशोक कदम (45) या महिलेला सर्पदंश झाल्याने तातडीने पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याची वेळ आली असता याठिकाणी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका व त्यातील डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने अश्विनी  कदम या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या मयत महिलेच्या कुटुंबियांनी मंगळवारी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मढवी यांची भेट घेतली व अश्विनी यांच्या मृत्यूस आरोग्य व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी दोषी असणार्‍यांवर दोन दिवसात कारवाई न केल्यास आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. मयत महिलेचे नातेवाईक व रिपाइं कार्यकर्त्यांनी पाली पोलीस ठाणे व तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना तक्रारींचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. रुग्णवाहिका व डॉक्टर मिळवण्यासाठी आम्ही प्रचंड धडपड केली. 108 रुग्णवाहिका मिळण्यात दोन तास विलंब झाला. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने अश्विनी कदम यांचा बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर माझ्या काकीचे प्राण वाचले असते, असे गणेश कदम यांनी यावेळी सांगितले. सुधागड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचा हा बळी असल्याचे सांगत दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी  रिपाइं सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे यांनी यावेळी केली. कारवाई न झाल्यास रिपाइं आंदोलन छेडेल असा इशाराही सोनावळे व मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिला. यावेळी राहुल सोनावळे, नरेश शिंदे, गणेश कदम, राजेश गायकवाड, सतीश गायकवाड, संदेश शिंदे, अरुण शिंदे, मिलिंद शिंदे, रितेश गायकवाड, लक्ष्मण शिंदे, प्रशांत शिंदे आदींसह ग्रामस्थ व रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्धर येथील महिलेच्या मृत्यूबाबत चौकशी करून कुटुंबियांच्या मागणीच्या अनुषंगाने दोषी आढळणार्‍यावर योग्य ती कारवाई केली जाईल. -डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply