कर्जत : प्रतिनिधी
पारंपारिक शेतपीक घेण्यापेक्षा कोणत्या शेतमालाचा दर चांगला आहे, ते पाहून पीक घेतल्यास शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरेल, असा विश्वास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी सोमवारी (दि. 1)व्यक्त केला. कृषिदिनाचे औचित्य साधून कर्जत प्रेस क्लबने साळोख तर्फे नीड या गावात आयोजित केलेल्या आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
विशेष प्रकल्प अधिकारी भाग्यशाली शिंदे यांच्या हस्ते शेती आवजाराचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रेस क्लब अध्यक्ष संजय गायकवाड यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ’यशोगाथा प्रगतशील शेतकर्यांची’ या पुरस्कार प्राप्त शेतकर्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर तुकाराम हाबळे (पोशीर), वामन कराळे (बेकरे) आणि चंद्रकांत तात्याजी तथा दादा कडू (साळोख) यांना घेरडीकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल आणि औषधी कोरफडाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. वामन कराळे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी कृष्णा कदम, संतोष पवार, भाग्यशाली शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी सूत्रसंचालन केले.सामाजिक कार्यकर्ते मारुती घारे, सरपंच आण्णा कातकरी, क्लबचे कार्याध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष जयवंत हाबळे, खजिनदार नरेश शेंडे, संजय मोहिते, धर्मानंद गायकवाड आदींसह शेतकरी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. कांता हाबळे यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper