Breaking News

…तर 4 मेपासून वैद्यकीय वगळता सर्व सेवा बंद करू!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा शासनाला इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलहून मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी जात असलेल्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 80 टक्के हेच कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पनवेल परिसरावर मोठ्या संकटाचे ढग पसरले आहेत. त्या अनुषंगाने संबंधितांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. जर याबाबत निर्णय झाला नाही तर 3 मेनंतर पनवेलला कोरोना विषाणू संसर्गापासून वाचवण्यासाठी वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करू, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. दरम्यान, याचसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर शुक्रवारी (दि. 1) संध्याकाळी 6.30 वाजता फेसबुक लाइव्हदारे पनवेलकर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कळंबोली, कामोठे, खारघर, पनवेल शहर, काळुंद्रे, खांदा कॉलनी या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातसुद्धा काहींना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुधवारी तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सात व शेजारील विचुंबेत एक असे एकूण आठ रुग्ण आढळले. प्रशासनाच्या वतीने कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनताही काही अपवाद वगळता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आहे, मात्र आजवर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वर्गवारी पाहता तालुक्याबाहेर निरनिराळ्या अत्यावश्यक सेवा देणारे आहेत.
यामध्ये सीआयएफएस जवान, डॉक्टर, परिचारिका त्याचबरोबर लॅब टेक्निशियन, पोलीस, सफाई कामगार असल्याचे आढळून आले आहे. एकंदरीतच जे रुग्ण सापडले आहेत त्यांनी या विषाणूंचे संक्रमण पनवेल बाहेरून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पनवेल शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी पनवेलबाहेर अत्यावश्यक सेवा देणार्‍या शासकीय व खाजगी आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचारी यांची व्यवस्था कामाच्या ठिकाणाजवळ करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या अगोदरच केली आहे आणि असे केले तर महापालिका क्षेत्रातील संक्रमण थांबेल व परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत मागील गुरुवारी (दि. 23) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देण्यात आले आहे, पण त्याबाबत अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी पनवेलला मुंबई कनेक्शन असलेले रुग्ण रोज वाढत आहेत. त्यांच्यापासून कुटुंबीयांना तसेच इतरांना संसर्ग होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पनवेलला रूग्णांची संख्या वाढेल अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे जर राज्य सरकारने पनवेल परिसरातून मुंबईत अत्यावश्यक सेवेकरिता जाणार्‍यांची त्यासाठी काही व्यवस्था केली नाही तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बेमुदत काळासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.
कोरोनामुळे पनवेलमधील परिस्थिती भीषण होऊ नये यासाठी वैद्यकीय सेवा वगळून सर्व सेवा 4 मेपासून आठवड्याभरासाठी बंद ठेवून पनवेल ग्रामीण व महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिक, उद्योजक व्यापारी संघटनांनी या प्रयत्नात सहभाग आणि सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी समस्त पनवेलकरांना केले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्र तसेच तालुक्यातून अनेक जण अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी मुंबई जातात. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे आदर आहे, परंतु त्यांच्यामार्फत कोरोनाचे संक्रमण होत आहे. पनवेल परिसरातील इतर नागरिकांना धोका आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या कुटुंबालासुद्धा कोरोना संक्रमणाची भीती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्र्यांकडे संबंधितांना कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याबाबत मागणी केली आहे, मात्र त्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय झाला नाही तर 3 मेनंतर पनवेलमधील कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी बेमुदत काळासाठी मेडिकल वगळता इतर सेवा बंद करू.
-प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

पाली देवद (सुकापूर) आणि विचुंबे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र
पनवेल : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पाली देवद (सुकापूर) आणि विचुंबे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या अत्यावश्यक सेवेतील मुंबई आणि जवळच्या शहरात जाणार्‍या कर्मचार्‍यांची राहण्याची सोय त्यांच्या कामाच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी या दोन्ही ग्रामपंचायातींच्या ग्रामसेवकांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे.  
पनवेल महापालिका क्षेत्राबरोबरच पनवेलच्या ग्रामीण भागात सुकापूर आणि विचुंबे येथेही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील मुंबईला आणि जवळच्या शहरात जाणार्‍या कर्मचार्‍यांची राहण्याची सोय त्यांच्या कामाच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी करण्यात आली आहे
पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमची ग्रामपंचायत पनवेल महापालिका क्षेत्राला लागून असून, येथील लोकसंख्या 13 हजारच्या आसपास आहे. येथे 50 गृहनिर्माण संस्था आहेत. येथील अनेक जण मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जात असतात. 124 कर्मचारी मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जात आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोना संक्रमणाचा धोका आहे, तर विचुंबे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी, आमची ग्रामपंचायत  पनवेल महापालिका क्षेत्राला लागून असून, येथील लोकसंख्या 20 हजारपेक्षा जास्त आहे. येथे 95पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था आहेत. येथून 291 जण मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जात आहेत. येथील जनता चांगल्या प्रकारे लॉकडाऊन पाळत असताना जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांपासून कोरोना रोगाचा प्रसार होत आहे. त्यामुळे त्यांची सोय कामाच्या ठिकाणीच करावी, असे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply