
भारतभरात आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस शिवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो.
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.
काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना 16 सोमवरांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महाशिवारात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडी अडचणी दूर होतात, महादेव प्रसन्न होतात. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.
महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे. एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरिणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणून लागली- मला मार पण इतराना सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.
महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जाता. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शिवाचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.
आध्यात्मिक महत्त्व
महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.
अध्यात्माच्या मार्गावर असणार्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात. परंतु योगी व्यक्तींसाठी, हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले-अतिशय स्थिर.
योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper