Breaking News

तीन षटके, शून्य धावा, तीन बळी!

भारताच्या दिप्ती शर्माची अफलातून गोलंदाजी

सुरत : वृत्तसंस्था

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी मात केली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताच्या दिप्ती शर्माने भन्नाट गोलंदाजी करीत आफ्रिकेच्या फलंदाजांची पिसे काढली. दिप्तीने तीन षटकांत एकही धाव न देता तीन बळी टिपले.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेची कर्णधार सुने लुसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवातही अडखळती झाली. आपल्या कारकिर्दीचा पहिलाच सामना खेळणारी शाफाली वर्मा भोपळाही न फोडता माघारी परतली. शबनिम इस्माईलने तिचा बळी घेतला. यानंतर मराठमोळी स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रिग्ज यांनी छोटेखानी भागीदारी करीत भारतीय महिला संघाचा डाव सावरला, मात्र चांगल्या फॉर्मात असलेली स्मृती मंधाना 21 धावा काढून माघारी परतली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या सहकार्‍यांना हाताशी धरत भारताला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. एकीकडे भारतीय फलंदाज माघारी परतत असताना हरमनप्रीतने 34 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 43 धावांची खेळी केली. 20 षटकांत 130 धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय महिलांनी आफ्रिकेला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आफ्रिकन महिला संघाची सुरुवात आश्वासक झाली होती. लिझेल ली आणि टॅझमिन ब्रिट्स यांनी भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना केला, मात्र नंतर दिप्ती शर्माने आफ्रिकन फलंदाजीचा कणा मोडला. तिला शिखा पांडे, पूनम यादव आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन बळी टिपत चांगली साथ दिली, तर हरमनप्रीत कौरने एक विकेट काढली आणि भारताने सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply