




समाज नियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तीवर्तनाला संघटित करीत व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करीत असतात. तसेच समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे कामही सामाजिक संस्थांमार्फत केले जाते. आज देशात, राज्यात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असून वेगवेगळ्या समाजातील आर्थिक, दुर्बल व नितांत गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचे तसेच अडीअडचणींवर मात तसेच समस्या सोडवण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येत असतात. सामान्यपणे एका उद्देशाने तयार करण्यात आलेली सामाजिक व्यवस्था स्वतःची एकत्रित उद्दिष्ट पाळत स्वतःच्या कामावर नियंत्रण ठेवते. अशी कार्य करणार्या संघटनांना संस्था म्हटले जाते. अशीच आपल्या सेवाकार्याने नावारूपास आलेली सामाजिक संस्था म्हणजे सदाशिव पारठे विकास प्रतिष्ठान आहे.
सत्यम् शिवम् सुंदरम् हे ब्रीदवाक्य घेऊन ही सामाजिक संस्था कार्य करीत आहे. विविध सामाजिक विषयांवर ही संस्था आपले योगदान देत आहे. तुरुंगातील कैदीही सजीव आहेत. त्यांना त्यांच्या अपराधाची भावना मनात उत्पन्न होण्यासाठी कारागृहाची सजा केली जाते, मात्र त्यांचे मनोबल उंचावण्याचा उद्देश अशा सेवाभावी संस्था करीत असतात. त्यापैकी सदाशिव पारठे या संस्थेचा उद्देशही असाच आहे. अशी अनेक मार्गदर्शन शिबिरे या संस्थेने राबविली आहेत.
रायगडातील तळोजा, अलिबाग व कल्याण कारागृहात कैद्यांसाठी प्रेरणा मार्गदर्शन कार्यशाळेस विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे विठ्ठलराव जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली होती, तर ज्येष्ठ कीर्तनकार श्रीराम पुरोहित यांचे बंदिजनांना उद्बोधक मार्गदर्शन झाले. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी स. पारठे विकास प्रतिष्ठानमार्फत शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, कपडे, ऋतुमानानुसार छत्र्या, स्वटेर, पाण्याच्या बाटल्या अशा साहित्यांचे वाटप करण्यात येत असते. शालेय
विद्यार्थ्यांबरोबरच गरजू, गरीब नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत रक्तगट तपासणी त्याचबरोबर स्वच्छतेचा वसा घेत गावोगावी कचराकुंड्या, आधारकार्ड नोंदणी प्रेरणा शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगांवर समर्पक उदाहरणसहित चांगला माणूस म्हणून समाजात कसे वागता येईल याबाबत मार्गदर्शनही करण्यात येत असते. सदाशिव पारठे विकास प्रतिष्ठान यांनी खालापूर व आसपासच्या परिसरात वणवे गावात आध्यात्मिक वसा सुरू केला. श्रीदत्त मंदिरात अध्यात्माबरोबरच व्यसनमुक्तीचा वसा घेतल्याने अनेकांना व्यसनमुक्त करून जगण्याची नवी उमेद निर्माण केली. परिसराबरोबरच कर्जत, खालापूर, पेण अशा तालुक्यांतील अनेक पीडितग्रस्तांना याचा चांगलाच लाभ झाला आहे. अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी यासाठी त्यांनी जागृती केली. याची सुरुवात स्वत:च्या कुटुंबापासून करीत कुलदेवतांना मुक्या प्राण्यांचे बळी देणे, पाचवीच्या दिवशी कोंबडा देणे, शेत बांधावरील म्हसोबा चेडोबाला बळी चढविणे बंद केले आणि अनेक कुटुंबांना ते बंद करायला भाग पाडले. समाजात हुंडा पध्दत बंद व्हावी यासाठी हुंडा देण्याच्या प्रथेलाही तीव्र विरोध करीत अडचणीच्या काळात अनेक गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करीत कधी आर्थिक तर कधी अन्नधान्याच्या रूपाने सढळ हस्ते मदत करीत मदतगार बनले. पारठेबुवांच्या सामाजिक कार्याची दखल घेत बिनविरोध निवड करीत ग्रामपंचायतीचा कारभार करण्यास आपला प्रतिनिधी म्हणून पाठविले. बुवांच्या माध्यमातून गावातील समस्या तसेच नागरिकांना सोयीसुविधा मिळू लागल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी शैक्षणिक प्रोत्साहन योजना राबविल्या.
वर्षातून दुबार शेतीपीक घेत घरात धनधान्याची कोठारेही भरून राहत असत. त्यांच्या कार्याचा गौरव जिल्हा परिषदेने करीत रायगड जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी हे मानांकन प्रदान केले होते, मात्र ज्याप्रमाणे जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला, या भजनाप्रमाणे कोकण दिंडी आळंदीस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी प्रस्थान करण्याच्या तयारीत असताना 21 नोव्हेंबर 2013 रोजी सदाशिव पारठे यांनी आपला देह ठेवला. समाजात विविध अनिष्ठ चालीरीती बंद व्हाव्यात, सर्वांना शासकीय सोयीसुविधा मिळाव्यात अशी तळमळ असणार्या सदाशिवबुवांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सदाशिव पारठे सेवाभावी संस्थेची स्थापन करण्यात आली आहे. देहावसान होण्याच्या दोन दिवस अगोदर मोफत आधारकार्ड शिबीर घेण्याचेही ठरले होते, मात्र त्यांच्या आकस्मिक जाण्याने सदर शिबिर एक महिन्यानंतर संपन्न झाले. त्यामध्ये 625 आधारकार्ड देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ पारठे यांनाही सामाजिक कार्याची आवड असून आतापर्यंत अनेक सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. याची नोंद रायगड जिल्हा परिषदेनेही घेतली आहे. याच स्तुत्य उपक्रमांच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून काशिनाथ पारठे यांनी वडिलांची स्मृती सामाजिक कार्यातून चिरंतन राहील या हेतूने सन 2014ला सदाशिव पारठे विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. शासनाने रक्तगट तपासणी सक्तीची केल्याने आदिवासी गरीब विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे रक्तगट तपासणी होत नव्हती. सदाशिव पारठे संस्थेच्या माध्यमातून तीन आदिवासी वाड्यांमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी मोफत करण्यात आली आहे. प्रतिष्ठानमार्फत सामाजिक काम करीत असताना कोणाकडूनही देणगी अथवा मदत न घेता स्वकष्टार्जित उत्पन्नातून 10 टक्के भाग हा गोरगरीब गरजूंसाठी वापरायचा असा निर्धार काशिनाथ पारठे यांनी केला होता. तो आजपर्यंत आबाधित राखला आहे. शासनाचे स्वच्छता अभियान सुरू असताना परिसरातील गावात स्वच्छता अभियान राबवून
प्रतिष्ठानकडून गावागावात कचराकुंड्या वाटप करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आजही आठवड्यातून एकदा सार्वजनिक स्वच्छता केली जात आहे. प्रतिष्ठानमार्फत पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवत असताना वृक्ष लागवड व वृक्षवाटप करण्यात येत आहेत. पाताळगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष पाठपुरावा संस्था करीत आहे. प्लास्टिकच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमांत पटवून संस्थेमार्फत आतापर्यंत तीन हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात गोरगरिबांसाठी आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करून मोफत औषध व चष्मेवाटप करण्यात आले आहेत. गोरगरीब आदिवासी बांधवांच्या मुलांसाठी शैक्षणिक आवड वाढीस लागण्यासाठी दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक साहित्याचे आणि गणवेशवाटप करून डिसेंबर महिन्यात काशिनाथ पारठे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी स्वेटर व खाऊवाटप करून मुलांना शाळेची आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न या माध्यमातून केले जातात. वै. सदाशिव पारठे यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी अनाथ मुलांना स्नेहभोजन दिले जाते. दिवाळीसारख्या सणामध्ये दुर्गम भागातील गरीब आदिवासी बांधवांत जाऊन त्यांना कपडे व फराळवाटप केले जाते. ही सेवा करीत असतानाच प्रतिष्ठानचे काम आज महाराष्ट्राच्या अनेक भागांत पोहचत आहे. त्याचीच पोच म्हणून कोल्हापूर येथे प्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त जनकल्याण सामाजिक संस्था कोल्हापूर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श समाजसेवेच्या पदकाने काशिनाथ पारठे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. प्रतिष्ठानकडून प्रबोधनाचे कार्य सुरू असताना कोकणातील सर्व कारागृहांत बंदिजनांसाठी प्रेरणा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून प्रत्येक बंदिजन हा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एक चांगला नागरिक कसा निर्माण होईल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून गरजूंना वेळेत रक्तपुरवठा करण्यासाठी तत्परतेने आजपर्यंत प्रयत्नशील राहून मदत केली जात आहे. सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत टाकवडे गावातील पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात औषधे, कपडे, अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली आहे. या सामाजिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम जोपासण्यासाठीही प्रतिष्ठान सदैव कटिबद्ध आहे. सत्यम् शिवम् सुंदरम् हे ब्रीद असणार्या सदाशिव पारठे विकास प्रतिष्ठानला यशस्वितेकडे नेण्यासाठी पारठे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि पत्रकार मित्र यांचे अनमोल सहकार्य लाभत असल्याचे सांगत काशिनाथ पारठे यांनी यानिमित्त सर्वांचे ऋण व्यक्त केले आहे.
एकल्याचा नव्हे हा खेळ।
म्हणोनी मेळ जमविला॥
-अरूण नलावडे, फिरस्ती
RamPrahar – The Panvel Daily Paper