Breaking News

‘त्या’ रस्त्यांची कामे रायगड विकास प्राधिकरणामार्फत करावी; स्वराज्य संघटनेतर्फे खा. छत्रपती संभाजीराजेंना निवेदन

माणगाव : प्रतिनिधी

रायगड विकास प्राधिकरणामार्फत माणगाव व महाड तालुक्यातील खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पंकज तांबे यांनी पाचाड (ता. महाड) येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी नेरावचे सरपंच सुनील कोरपे, ग्रामस्थ किरण दामुगडे, नरेश कदम, अनिल गोरे तसेच स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते. खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याची दूरवस्था झाली असल्याने तेथील ग्रामस्थांचे पुरते हाल होत आहेत. माणगावची बाजारपेठ जवळ असल्यामुळे नेराव ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो, रुग्णांना डोलीतून औषोधोपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात आणावे लागते, विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी पाच किमी पायपीट करावी लागते. खर्डी खुर्द येथून माणगावला येण्यासाठी पक्का रस्ता आहे. मात्र खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील उंडरेवाडी व घरोशीवाडी तसेच महाड तालुक्यातील नेराव व सुतारवाडी ही चार गावे रायगड विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यांचा प्राधिकरणामध्ये समावेश केल्यास या गावांच्या रस्त्याचा प्रश्न सुटून गावांचा विकास होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.  खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याचे काम रायगड प्राधिकरणामार्फत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या वेळी दिले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply