Breaking News

थर्टी फर्स्टच्या पाटर्यांवर पोलिसांचा वॉच

अलिबाग ़: प्रतिनिधी

नाताळ, थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील  हॉटेल्स आणि कॉटेजेसचे बुकींग फुल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून  या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या बेकायदा पार्ट्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. बेकायदा कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तशा सूचना पोलिसांनी व्यावसायिकांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी थर्टीफर्स्ट  आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांवर बंदी होती. यंदा मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिक, हॉटेल व कॉटेजेसचे मालक खुश आहेत. परंतु ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केलीच तर त्याचा इथल्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होवू शकतो. झालेले बुकींग रद्द होवू शकते. त्यामुळे  हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत.

अलिकडच्या काळात गोव्या पाठोपाठ अलिबाग तसेच रायगड जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी फेव्हरेट डेस्टिनेशन बनत आहे. नाताळाचा सण आणि लागून आलेल्या सुट्ट्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात येण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारेही सध्या पर्यटकांनी गजबजू लागले आहेत.

यंदा रायगडच्या किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. पोलिसांनी पर्यटनस्थळे असलेल्या गावागावात जावून पर्यटन व्यावसायिक, हॉटेल्स, लॉजेस, कॉटेज मालकांच्या बैठका घेत आहेत. या बैठकांमधून व्यावसायिकांना सूचना दिल्या जात आहेत.

अनुचित प्रकार घडू नये म्हणून 18 वर्षांखालील तरूण-तरूणींना, शक्यतो थिल्लरबाजी करणार्‍या समुहाला आपल्याकडील खोल्या भाड्याने देवू नका, बेकायदा दारू विक्री करू नका, परवाना असेल त्यालाच दारू पिण्याची परवानगी द्या, गांजा, हुक्का असे अंमली पदार्थ घेवून येणार्‍या पर्यटकांना मज्जाव करा, कुठलेही गैरप्रकार होवू नयेत याची काळजी घ्या, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी रात्री संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

आम्ही व्यावसायिकांच्या बैठका घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना देत आहोत. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. बेकायदा कृत्य करताना कुणी आढळले तर कडक कारवाई केली जाईल. आनंद घेताना त्याचा दुसर्‍याला त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. 

-शैलेश सणस, पोलीस निरीक्षक, अलिबाग

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply