कर्जत : प्रतिनिधी
शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कर्जत तालुका शिक्षणात अग्रेसर असावा यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. पुस्तक प्रकाशन करणे हे एक धाडसाचे काम आहे, असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड नुकतेच जांभिवली (ता. कर्जत) येथे केले. जांभिवली केंद्र शाळेतील शिक्षिका माधवी कोसमकर यांच्या ’जीवनगाथा’ या पुस्तकाचे आणि दुसर्या शिक्षिका प्रिया भोसले यांच्या महिलांवर आधारित काव्य संग्रहाचे प्रकाशन निवृत्त सैनिक विनायक उपाध्ये आणि ज्येष्ठ लेखिका मृदुला गडणीस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. जांभिवली शाळेच्या सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात संतोष दौंड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लेखनाचे संस्कार शाळेत होतात. शाळांमध्ये वाङ्मय मंडळ निर्माण करावे. त्यामुळे चांगली पिढी घडेल, असा विश्वास मृदुला गडणीस यांनी व्यक्त केला. जीवनकथा या पुस्तकाच्या विक्रीची संपूर्ण रक्कम सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार असल्याचे या पुस्तकाच्या लेखिका कोसमकर यांनी या वेळी जाहीर केले. विनायक उपाध्ये आणि तुकाराम यमगेकर यांचीही मनोगत व्यक्त केले. किशोर म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीला संतोष देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी इशस्तवन व पोवाडा सादर केला. केंद्र प्रमुख अरुणा गंगावणे, सरपंच योगेश देशमुख, पेण पतपेढीचे चेअरमन राजेश जाधव यांच्यासह शालेय व्यवस्थान समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य पालक व केंद्रातील शिक्षक या वेळी उपस्थित होते. माधवी कोसमकर यांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper