अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेबद्दल शनिवारी (दि.11) भाजपच्या वतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला.
राजेंद्र पाटील हे येथेच थांबले नाहीत, तर त्यांनी विमानतळबाधित पुनर्वसन या विषयावर गायकवाड गुरुजींनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपचे पनवेल तालुका ग्रामीण पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ यांनी सांगितले की, राजेंद्र पाटील यांनी येत्या दोन दिवसांत अतुल पाटील यांची माफी मागितली नाही, तर सोमवारी उलवे चौकातून सर्व भूमिपुत्रांच्या वतीने धिंड काढून निषेध मिरवणूक काढण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की, हे वक्तव्य फक्त वैयक्तिक टीकेपुरते मर्यादित नसून सामाजिक स्तरावर अपमानास्पद असून यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. लोकनेते स्व. लोकनेते दि.बा. पाटील यांच्या कुटुंबियांवर जर कोणी टीका करत असेल, तर इथला भूमिपुत्र ते सहन करणार नाही.
निषेध आंदोलनावेळी भाजपचे नेते हेमंत ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, कमलाकर देशमुख, निलेश खारकर, किशोर पाटील, वितेश म्हात्रे, सुहास भगत, अखिलेश यादव, विराज देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper