पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा, नवीन पनवेल शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि दूरदृष्टीचा वारसा युवा पिढीमध्ये रुजवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेमुळे नवीन पनवेलमधील तरुणाईत मोठा उत्साह दिसून येत आहे.
या स्पर्धेंतर्गत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी नवीन पनवेल शहरात स्पर्धकांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींची पाहणी केली. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केलेल्या प्रतिकृतींमध्ये दोन किल्ले विशेष लक्षवेधी ठरले. राजे शिवराय प्रतिष्ठान यांनी साकारलेला समुद्रातील अभेद्य किल्ला जलदुर्ग खांदेरी आणि वक्रतुंड मित्रमंडळाने साकारलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि मराठा साम्राज्याची शान असलेला, किल्ले रायगड. या वेळी परेश ठाकूर यांनी स्पर्धकांनी किल्ला बांधणीसाठी माती, दगड, लाकूड आणि इतर नैसर्गिक वस्तूंचा वापर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी प्रेरित केले. ही स्पर्धा विशेषतः नवीन पनवेल शहरातील रहिवाशांसाठी खुली आहे. स्पर्धकांना शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या किंवा संकल्पित केलेल्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करायची आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा, नवीन पनवेल शहर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना हा शौर्याचा वारसा आपल्या हातातून साकारण्याचे आवाहन केले आहे.
या पाहणीवेळी नवीन पनवेल मंडल युवा मोर्चा अध्यक्ष मयूर कदम, सरचिटणीस अक्षय सिंह, प्रभाग अध्यक्ष श्रावण घोसाळकर, मोहित शर्मा, केवल शाह यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper