
अलिबाग : जिमाका
जिल्ह्यात दिव्यांगांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीसुविधा समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग मतदारांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लागणार्या दस्तऐवजाची माहिती देणारे तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅटद्वारे मतदान कसे करावे याबाबत माहिती देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तींना मतदान यंत्राची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी (मूक व कर्णबधिर) चला मतदान करू, हा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सांकेतिक भाषेतील संदेश प्रसिध्द करण्यात आला. या वेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीसुविधा समितीचे नोडल अधिकारी जी. एम. लेंडी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, सर्कल अधिकारी जितेंद्र कांबळे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper