खोपोली : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड जिल्हा आगरी सेनेच्या वतीने गुरुवारी (दि. 10) खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मानवी साखळी तयार करून तहसीलदारांना निवेदन देण्याचे रायगड जिल्हा आगरी सेनेने ठरविले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने फक्त पाच जणांना परवानगी दिल्याने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. रायगड जिल्हा आगरी सेना प्रमुख सचिन मते यांनी शासकीय नियमांचे पालन करून खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांना मागणीचे निवेदन दिले. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी मान्य न झाल्यास येत्या 24 तारखेला सी.बी.डी. बेलापूर येथील सिडको भवन कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असे सचिन मते यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper