भर पावसात किल्ल्यावर राबविले स्वच्छता अभियान


पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील विविध किल्ल्यांवर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गड किल्ले संवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने नुकतीच घेरा सुरगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी भर पावसात प्रतिष्ठानच्या 20 सदस्यांनी किल्ल्याची व परिसराची साफसफाई व स्वच्छता केली.
गेल्या आठवडा भरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तरी देखील पावसाची पर्वा न करता श्रमदान मोहीमेसाठी 20 दुर्गवीर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी गडावरील वाटेतील गवत काढुन रस्ता मोकळा केला. ही वाट एक बैलगाडी जाईल एवढी रुंद आहे. याबरोबरच किल्ल्यावरील वाडा, सदर, मंदिर परिसरातील गवतदेखील काढण्यात आले. या सुरगड मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांच्यासह अजित राणे, प्रशांत डिंगणकर, अर्जून दळवी, नितीन पाटोळे, सचिन रेडेकर, समिर शिंदे, निलेश वाघमारे, प्रज्वल पाटील, स्वप्नील पांचाळ, अमित थोरात, राजेश चाळके, भूषण पवार, प्रदिप शिरसाट, दीपक नारकर, उज्वला शिखरे आणि चिपळूणवरून आलेले रोहीत बालडे व राकेश इंदुलकर सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper