Breaking News

देवपाडा-वंजारपाडा रस्त्याची दुरवस्था

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील नेरळ देवपाडा – वंजारपाडा रस्त्याची पुरती वाट लागली आहे. हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. पुढे चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.

नेरळ -वंजारपाडा मार्गे देवपाडा, चिंचवाडी या गावांना जोडणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष झाल्याने मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झालेले नाही. त्यापैकी  वंजारपाडा ते चिंचवाडी हा रस्ता तर अत्यंत खराब झाला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या परिसरातील ग्रामस्थांना वर्षोनुवर्षे या खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे जिकरीचे झाले असून, संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्ता प्रवासायोग्य करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

देवपाडा -वंजारपाडा या परिसरातील आदिवासी वाड्या, वस्त्यांना नेरळला जोडणारा रस्ता झाला, मात्र देखभाली अभावी या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. या परिसरातील आदिवासी बांधव उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लागवड करतात. तो विकण्यासाठी ते याच मार्गाने बाजारात नेतात. कामगार वर्गाला याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे मिनिडोर चालक, रिक्षा चालक या गावांना  यायला कचरत आहेत, दुचाकी चालकास तर खड्डे चुकवत प्रवास करावा लागत असून, काही वेळेस अपघातही घडत आहेत.  मागील अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्थिची मागणी करत आहेत, मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षेमुळे अद्यापही हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.

वंजारपाडा गावचा रस्त्याची अवस्था बिकट आहे, रस्त्यावर खड्डे असल्याने  कोणतेच वाहन, रिक्षा गावात येत नाही. आम्हा ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे. आठ दहा वर्षापासून या रस्त्याचे काम झालेले नाही, याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे

-रामदास राणे, रिक्षा चालक, वंजारपाडा, ता. कर्जत

नेरळ – देवपाडा – चिंचवाडी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की, रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता हेच समजत नाही. वाहन चालकांना या रस्त्यावर प्रवास करून पाठदुखीचा त्रास होत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी व चांगला रस्ता तयार करण्यात यावा.

-कैलाश विरले, उपसरपंच, दहिवली ग्रामपंचायत, ता. कर्जत

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply