भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ वाया न दवडता कोकण दौर्याला सुरुवात केली. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून राज्य सरकारने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक साह्य करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस हे स्वत: उत्तम प्रशासक आहेत. आपत्ती व्यवस्थापनाबाबत त्यांनी केलेल्या सूचना सत्ताधार्यांनी खुल्या मनाने स्वीकाराव्यात. त्यात राजकारण अथवा अहंकार आडवा येऊ नये ही अपेक्षा काही फार मोठी म्हणता येणार नाही.
लागोपाठ दुसर्या वर्षी कोकण किनारपट्टीला चक्रीवादळासारख्या भीषण आपत्तीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यापासून तळकोकणापर्यंतच्या विस्तीर्ण इलाख्याची निसर्ग वादळामुळे वाताहत झाली होती. त्यातून कोकणवासीय पुरते सावरलेही नव्हते. अशात कोरोनाशी झुंजता-झुंजता मेटाकुटीला आलेल्या कोकणकिनार्याला यंदा तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला. निसर्गाच्या रुद्रावतारापुढे कुणाचे काही चालत नाही, परंतु नैसर्गिक आपत्तीसारख्या महासंकटाबाबत निदान राजकारण करू नये एवढे भान तरी सत्ताधार्यांनी ठेवायला हवे. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील बहुतेक गावांचे आणि तेथे राहणार्या गावकर्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये किमान दोनशेहून अधिक शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. हजारो उपयुक्त झाडे जमीनदोस्त झाली आहेत. शेकडो वाड्या-वस्त्यांमध्ये अजूनही वीज आलेली नाही. कारण विजेचे खांब जागोजागी उन्मळून पडले आहेत. वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी पंधरवडा तरी जाईल असे दिसते. रायगड जिल्ह्यातील वाताहतीचे दृश्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. फडणवीस यांच्या समवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी हेदेखील या दौर्यात सहभागी होते. सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते यथावकाश दौरे काढतीलच. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत कोकणचा दौरा करतील असे सांगण्यात येते. गेल्या वर्षी निसर्ग वादळाने केलेली ससेहोलपट मुख्यमंत्र्यांनी पाहिली होती. त्यासाठी अलिबागचा दौराही त्यांनी केला होता. निसर्ग चक्रीवादळाला सामोरे गेलेल्या कोकणवासीयांसाठी तुटपुंज्या का होईना पण आर्थिक साह्याची घोषणा करण्यात आली होती. त्या आर्थिक साह्याचे काय झाले हा एक संशोधनाचा विषय आहे. तौक्ते चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची व्याप्ती बरीच मोठी आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने सगळ्या संवेदना जाग्या ठेवून निर्णय घ्यावा व तौक्ते वादळग्रस्तांसाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी. पूर्वानुभव पाहता तसे काही घडेल याची खात्री वाटत नाही. सत्ताधार्यांना रस आहे तो फक्त खुर्चीच्या राजकारणात. आर्थिक मदत किंबहुना कुठल्याही प्रकारची मदत म्हटले की विद्यमान राज्य सरकार केंद्र सरकारकडे हात पसरते हा गेल्या दीड वर्षातला अनुभव आहे. तौक्ते वादळ महाराष्ट्र व गुजरातच्या सीमा ओलांडून गेले न गेले तोच तशी अपेक्षा सत्ताधारी करूदेखील लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वादळग्रस्त गुजरात आणि दीव-दमणची हवाई पाहणी केली. पंतप्रधान महाराष्ट्रात का आले नाहीत, असा सवाल महाविकास आघाडीतर्फे तत्काळ करण्यात आला. या सरकारला मदतीपेक्षा राजकारणातच अधिक रस आहे हे यावरून स्पष्ट दिसते. कोकणवासीयांना नेतेमंडळींचे दौर्याचे राजकारण नको आहे. त्यांना हवी आहे ती तातडीची मदत.
RamPrahar – The Panvel Daily Paper