Breaking News

द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

नाताळ तसेच शनिवार, रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची शुक्रवारी रात्रीपासून द्रुतगती मार्गावर प्रचंड गर्दी उसळली होती. खालापूर टोलनाका ते बोरघाटातील अमृतांजन ब्रिजदरम्यान अगदी संथ गतीने वाहतूक सुरू होती. बोरघाटातून खंडाळाकडे जाण्यासाठी काही वाहनचालक नो एन्ट्रीतून घुसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवारी पहाटे वाहतूक कोंडीचे चित्र न भूतो न भविष्यती असे होते. बोरघाट व खालापूर पोलीस तसेच वाहतूक पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे शनिवारी दुपारनंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळाले.

सुट्टी व हुडहुडी भरणार्‍या थंडीचा मोसम पाहून अनेक पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वरला तर भाविकांनी कोल्हापूरची अंबाबाई, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानीमातेच्या दर्शनाचे बेत आखले होते. त्यासाठी बहुसंख्य पर्यटक खाजगी वाहनाने शुक्रवारी रात्री निघाले होते. त्यामुळे मुंबई-पुणे दु्रतगतीमार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. त्याचा परिणाम खोपोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पहावयास मिळाला. द्रुतगती मार्गावरील वाहतूक कासवगतीने सुरू असल्याने अनेक वाहनचालकांनी खालापूर बायपासमार्गे खोपोली शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. खोपोली पोलिसांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळविले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply