मोदी द्वेषाने पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांना कुठल्याही थराला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सुपर फ्लॉप ठरवण्याची घाई झाली आहे. नेमका हाच अजेंडा काँग्रेस पक्षाच्या द्वेषाच्या टूलकिटमध्ये ठळकपणे दिसून येतो. वास्तविक ही वेळ राजकारणाची नव्हे आणि द्वेषाच्या राजकारणाची तर अजिबातच नव्हे. ही वेळ आहे एकदिलाने आणि एकजुटीने काम करून कोरोना आणि अन्य संकटांचा मुकाबला करण्याची. द्वेषाचा आगडोंब उसळला की त्यात पहिला बळी माणुसकीचा जातो याचे प्रत्यंतर सध्या देशभर येत आहे. विशेषत: राजकारणाच्या क्षेत्रात द्वेषाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर पेटलेले दिसते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी तीन दिवसांपूर्वी काँग्रेसने तयार केलेले मोदी द्वेषाचे टूलकिट उघडकीस आणले. कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीचा राजकीय फायदा उठवण्यासाठी विविध मार्गांनी केंद्र सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा कार्यक्रम कुठल्या थराला गेला आहे हे त्यावरून लक्षात येते. द्वेषाच्या राजकारणाची इतकी खालची पातळी काँग्रेसला गाठावी लागली याचे प्रमुख कारण या पक्षाच्या पराभूत मानसिकतेत दडलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या तथाकथित संशोधन विभागातील कुणा सौम्या वर्मा या कार्यकर्तीने हे टूलकिट तयार केले आणि दुर्दैवाचा भाग म्हणजे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यानुसार वेड्यावाकड्या टीकेचा भडिमार केंद्र सरकारवर सुरू ठेवला. या टीकास्त्रामध्ये आणि आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये संपूर्ण देश सध्या भरडून निघत आहे. आभाळ फाटले तर ठिगळ कुठे लावणार असे हताशपणे म्हणण्याची वेळ ओढवली आहे. इस्पितळातील अपुर्या खाटा, ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांसाठी होणारी परवड, यातच म्युकरमायकोसिस या आणखी एका जीवघेण्या बुरशीजन्य आजाराची भर पडली आहे. देशात सध्या बहुतेक ठिकाणी कडक निर्बंध लागू असल्याकारणाने अर्थचक्रही पुन्हा एकदा रुतल्यासारखे झाले आहे. एकीकडे कोरोनाचा मार आणि दुसरीकडे महागाईचा भडका अशा कात्रीत देश सापडलेला असताना संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला. इतक्यावरच ही संकटांची मालिका थांबलेली नाही. यास नावाचे नवे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालच्या रोखाने निघाले आहे. एका मागोमाग एक संकटे अंगावर धावून येत असताना केंद्र सरकार प्रयत्नांची शर्थ करताना दिसते, परंतु हे शहाणपण एकतर्फी आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते. कारण विरोधीपक्षांना मात्र या संकटकाळामध्ये राजकारणाची संधी दिसते आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी दहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही जिल्हाधिकार्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीबद्दल कुठल्याही मुख्यमंत्र्याने नाराजीचा सूर काढला नाही. अपवाद फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा. या बैठकीत आपल्याला बोलूच देण्यात आले नाही, असा कांगावा त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या ममता बॅनर्जी यांचा विजयोन्मादाचा ज्वर अद्याप ओसरलेला नाही हेच यावरून दिसते. देशाचे कंबरडे जेव्हा मोडते तेव्हा प्रत्यक्षात ते सामान्य जनतेचेच मोडलेले असते. संकटाच्या काळामध्ये द्वेषाचे राजकारण करणार्या काँग्रेस आणि इतर पक्षांचे वर्तन हे स्वत:च्या पायावरच कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे. द्वेषाच्या राजकारणाने कधीच कुणाचे भले झाले नाही. तो मार्ग विरोधकांनी टाळावा एवढीच किमान अपेक्षा आहे.
द्वेषाचे टूलकिट
Ramprahar News Team 20th May 2021 महत्वाच्या बातम्या, संपादकीय Leave a comment 281 Views
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper