राज्य शिक्षण विभागाचा निर्णय
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. राज्यात कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, आता असणार्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून व विद्यार्थी हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणार्या शाळांमधील इयत्ता नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती
देण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील.
कोविड-19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये 23 नोव्हेंबर 2020पासून सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे, तसेच इयत्तानिहाय यू ट्यूब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेत. राज्यातील शिक्षकही या परिस्थितीत ऑनलाइन, ऑफलाइन स्वरूपात विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सुरू ठेवत आहे. राज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिकणे वेगवेगळ्या मार्गांनी कसे सुरू राहील या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. ज्या ज्या मार्गाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता येईल त्या मार्गाने विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर अनेक शाळांनी, उच्च माध्यमिक विद्यालयांनी अनेक प्रयत्न केले आहेत. या काळात शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात केलेले अध्यापन, अंतर्गत मूल्यमापन केले आहे, असे गायकवाड म्हणाल्या.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. त्यावर या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक व इंटरनेट सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. ते लक्षात घेता शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.
RamPrahar – The Panvel Daily Paper