
पनवेल : दादाराम मिसाळ
नवीन पनवेलमध्ये शनिवारी सायंकाळी शिवशाही अवतरली. निमित्त होते राजे शिवराय प्रतिष्ठानने साकारलेल्या ‘किल्ले श्री राजगड’ प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्याचे. मराठीतील कलाकार, शिवव्याख्याते सौरभ करडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
सिडको आरक्षित पोलीस मैदान, नवीन पनवेल, सेक्टर 7 येथे राजे शिवराय प्रतिष्ठान पनवेल आयोजित भव्य ‘किल्ले श्री राजगड’ प्रतिकृती उभारली असून या प्रतिकृतीचे उद्घाटन शनिवारी (दि. 26) सायंकाळी 7.30 वाजता रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच फत्तेशिकस्त चित्रपटातील कलाकार आस्ताद काळे, हरिष दुधाडे, पनवेल तहसीलदार श्री. सानप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, नगरसेवक समीर ठाकूर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख शिववक्ते म्हणून सौरभ करडे यांनी ‘राजगड एक गडपुरुष’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. शिवरायांचा व प्रामुख्याने राजगड किल्ल्याचा इतिहास ऐकताना उपस्थितांच्या अंगात रोमांच उभे राहिले. आजारी असताना त्यांनी आपल्या खड्या आवाजात जणू शिवशाही उपस्थित केली व त्यांच्या वक्तृत्वाला खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह उपस्थित सर्वांनीच दाद दिली. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी राजगड प्रतिकृतीची पाहणी करून राजे शिवराय प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौत्ाुक केले. किल्ले संवर्धनासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही जिल्हाधिकार्यांनी दिली. महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी राजे शिवराय प्रतिष्ठानच्या सदस्यांची पाठ थोपटली.
या कार्यक्रमासाठी राजे शिवराय प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी अथक परिश्रमातून राजगडची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली होती. राजे शिवराय प्रतिष्ठानचे प्रमुख संघटक महेश पवळे, पनवेलचे संघटक संजय पाटील यांनी मार्गदर्शन करून आभार मानले. शिवभक्तांसाठी ही प्रतिकृती पाहता येणार आहे. शनिवारपासून प्रतिकृती पाहण्यासाठी बच्चे कंपनीसह सर्वांचीच मोठी गर्दी होत आहे. स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन राजे शिवराजय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper