नवी मुंबई : बातमीदार – राज्य शासनाने नुकताच मुंबईमध्ये येणार्या वाहनांना पाच ते 25 रुपये पर्यंतची टोल दरवाढ केलेली आहे. नवी मुंबई ही मुंबईला लागूनच असल्याने व नवी मुंबईतील वाहने दररोजच मुंबईला ये-जा करीत असल्याने ही टोल दरवाढ नवी मुंबईतील वाहनांना लागू करू नये असे निवेदन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांच्या नोकर्या गेल्याने व संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना नवी मुंबईतील वाहनांना सदर टोलची केलेली दरवाढ अयोग्य असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. नवी मुंबईतील वाशी व ऐरोली टोल नाक्यावर नवी मुंबईतील वाहनांना खर्या अर्थाने टोल माफीची आवश्यकता असताना राज्य शासनाने केलेल्या टोल दरवाढीने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही टोल दरवाढ रद्द न केल्यास नवी मुंबईतील नागरिकांसहित आंदोलन करण्याचा इशारा आ. म्हात्रे यांनी पत्रात दिला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper