नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
टाळेबंदी शिथिलीकरणानंतर शहरातील उद्याने, मैदाने खुली झाली मात्र ती फक्त ठरावीक वेळत चालने, व्यायाम, सायकलिंगसाठीच, मात्र खेळांसाठी मैदाने बंदच आहेत. त्यामुळे खेळायचे कुठे असा प्रश्न विचारला जात असून मैदाने खेळांसाठी खुली करण्याची मागणी होत आहे. खरंतर याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित असताना नवी मुंबईतील मैदानांबाबत शासनाची नियमावली लागू आहे. त्यामुळे खेळांसाठी असलेली 78 मैदाने खेळासाठीच वापरता येत नाहीत. नवी मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे सद्यस्थितील शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर सुरू आहेत. शासनाने शिथिलीकरण करताना उद्याने व मैदानांबाबत ती खुली करण्यास परवानगी दिली, मात्र तेथील खेळांसाठी ती खुली केली नाहीत. त्यामुळे नवी मुंबईत मैदाने व उद्याने ही केवळ व्यायाम, चालणे, धावणे व सायकलिंगसाठी सकाळी 5.30 ते 10 व सायंकाळी 5 ते 9 या वेळात खुली असतात. नवी मुंबई शहरात आठ विभाग कार्यालयाअंतर्गत 78 मैदाने आहेत. पालिकेने शहरात राजीव गांधी स्टेडियमसह यशवंतराव चव्हाण क्रिडांगण अशी अनेक मैदाने खेळासाठी विकसित केली आहेत. मैदानावर निर्बंध असल्याने खेळाच्या स्पर्धाही घेता येत नाहीत. राजीव गांधी मैदानात चित्रीकरणाला परवानगी पण खेळाला बंदी हा प्रकार चुकीचा असून आम्हाला पूर्वीप्रमाणे हे मैदान खेळासाठी उपलब्ध करून द्यावे असे स्थानिक रहिवासी सुहास औताडे यांनी सांगितले.
शहरातील खेळांची मैदाने काही ठरावीक वेळेतच खुली करण्याची शासनाची परवानगी आहे, परंतु स्थानिक पातळीवर याबाबत तत्काळ निर्णय घेऊन खेळाची मैदाने खेळासाठी खुली करण्यात येतील.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper