येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार -मुख्यमंत्री
मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.3) झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत या संदर्भात मोठा निर्णय झाला. या वेळी नामकरणाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली.
लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न व पाठपुरावा करत होती. याबाबत कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य आणि केंद्र सरकार लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाबाबत सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांच्या आत केंद्राच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाईल, अशी माहिती दिल्याचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सागितले.
दशरथ पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील तीन विमानतळांच्या नामकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्र सरकार एक फॉरमॅट राज्य सरकारला देणार आहे. तो फॉरमॅट राज्य सरकारने केंद्राकडे पाठवल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नामकरणाचा विषय पूर्ण केला जाईल.
या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार राजू पाटील, सुभाष भोईर, ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, दि.बा.पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, जे.डी.तांडेल, संतोष केणे, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे आता स्प्ष्ट झाले आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागले पाहिजे ही भूमिपुत्रांची आणि प्रकल्पग्रस्तांची इच्छा होती. यासाठी 2021 साली जून महिन्यात आम्ही आंदोलने पुकारली होती. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केल्यावर एक वर्षानंतर जेव्हा महायुतीचे सरकार राज्यात आले त्या वेळी सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात तो पास केला. या संदर्भात केंद्र सरकारची मंजुरी मिळत नाही म्हणून अलिकडच्या काळात ज्या लोकांचा आंदोलनाशी काही संबंध नाही अशा लोकांकडून चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे संभ्रम होता. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्य सरकारने दि.बा.पाटीलसाहेबांचेच नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात चर्चा केली आणि त्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितले की, राज्य सरकारने पाठविलेलेच नाव आम्ही स्वीकारत असतो. जी काही त्या संदर्भातील प्रक्रिया आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या नावाचा निर्णयही प्रलंबित आहे. संत तुकाराम महाराजांचे नाव पुणे विमानतळाला देण्याचा निर्णयसुद्धा प्रलंबित आहे. त्याच्याबरोबर हा निर्णय आहे. त्यामुळे केवळ एकट्या दि.बा.पाटीलसाहेबांच्या नावाचा निर्णय प्रलंबित नाही. राज्य सरकार याबाबतीत ठाम आहे. केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची अडचण नाही. प्रक्रिया पूर्ण होईल आणि ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिले जाईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper