पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 12) येथे केला. यासाठी आवश्यक तो ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असून लवकरच अधिकृत घोषणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मुलाखतीचा कार्यक्रम कळंबोली येथे झाला. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या संवादात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानिवलकर यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमासाठी 100हून अधिक गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘व्हिजन 2030 पनवेल’ ही संकल्पना मांडत येथील सर्वांगीण विकासाचा आराखडा सादर केला.
या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, डॉ. गिरीश गुणे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे आदी मान्यवरांसह विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विकासाचा सविस्तर आराखडा उलगडून सांगितला. पाणी, वाहतूक, विमानतळ, मालमत्ता कर, नैना प्रकल्प, स्वयंपुनर्विकास योजना अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पनवेलमधील पाण्याच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्हावाशेवा टप्पा-3मधून 65 एमएलडी पाणी पनवेलला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पोशीर आणि शिलार ही दोन धरणे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून एमएमआरडीए खर्च उचलणार, पाटबंधारे विभाग काम करणार आणि राज्य सरकार कर्जाची हमी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिलार धरणासाठी 3600 कोटींचा संपूर्ण बोजा पालिकेवर पडणार नाही, केवळ काही हिस्सा पनवेल महापालिकेला द्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालमत्ता कराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. कर माफ करण्याची आश्वासने ही निवडणूक जिंकता येणार नाही हे माहीत असल्याने दिली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. जे निवडून येणार नाहीत ते ताजमहाल देतो, मोटार देतो अशी खोटी आश्वासने देतात; त्यात कोणाच्या बापाचे काही जात नाही, अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती 575 चौरस किलोमीटरचे नैना क्षेत्र, एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी उभारली जाणार असून त्यामुळे पनवेल-नवी मुंबई परिसरात सुमारे सहा लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कळंबोली सर्कल येथे 750 कोटींचे उड्डाणपूल व रस्ते प्रकल्प सुरू असल्याचे तसेच सिडकोकडून 59 किलोमीटरची मेट्रो मार्गिका उभारली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पुढील तीन वर्षांत या सर्व प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा त्यांनी केला. धोकादायक व जीर्ण इमारतींसाठी स्वयंपुनर्विकास धोरणामुळे रहिवाशांना कमी किमतीत दुप्पट क्षेत्रफळाची सदनिका मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
मुंबईतील विमानतळ बंद होणार नाहीत, उलट त्यांची क्षमता दीडपट वाढवली जाईल, असे सांगत लंडनप्रमाणे मुंबईला अनेक विमानतळांची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. या सर्व पार्श्वभूमीवर भविष्यातील पनवेल घडवण्यासाठी महायुतीला मतदान करा, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा शेवट केला. विकासाच्या मोठ्या स्वप्नांसह सादर केलेले ’व्हिजन 2030 पनवेल’ हेच आगामी निवडणुकीतील महायुतीचे प्रमुख शस्त्र ठरणार असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper