
पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने व जनहितार्थ बदल्या केल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
यामध्ये उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांची महापालिका अतिक्रमण प्रमुखपदी, तर रिक्त झालेल्या उरण पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी संदीपान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारत कामत यांची आरबीआय सुरक्षा येथे तर रिक्त झालेल्या सानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी वाशी वाहतूक शाखेचे बापूराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची वाहतूक शाखेत तर त्यांच्या जागेवर वाशी पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांची, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर त्याच पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागी महापालिका अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संजीव धुमाळ यांची वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांची खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी, सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची परवाना शाखेत, कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांची वाशी पोलीस ठाणे येथे, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांची उरण पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील निरीक्षक प्रमोद भोसले यांची वाहतूक शाखेत तर वाहतूक शाखेतील सुधाकर ढाणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
एपीएमसीचे वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागेवर परवाना शाखेचे पोलीस निरीक्षक तनवीर शेख यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांची वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर वाशीचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांची वाहतूक शाखेत तर त्यांच्या जागी विशेष शाखेतील अजय कांबळे यांची वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper