नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईच्या कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांची सराईत टोळी असल्याचेही कळते. सारस्वत बँकेच्या कोपर खैरणे सेक्टर 19 येथील शाखेवर गुरुवारी दुपारी दरोडा पडला होता.
बँकेत आलेल्या अज्ञात दोघांनी कर्मचार्यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकर रूम उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर लॉकरमधील सुमारे साडेचार लाखाची रोकड लुटून त्यांनी पळ काढला होता. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र पोलिसांचा बंदोस्त असतानाही घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती, तर भरदिवसा बँकेवर दरोडा टाकून गुन्हेगारांनी पोलिसांनाही आव्हान दिले होते.
या प्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान सीसीटीव्हीमधून संशयितांची माहिती समोर आली. त्याद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तपास पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबईत लपलेल्या संशयितांची माहिती एका पथकाला मिळाली.
यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार अद्याप फरार आहेत.
या टोळीने बँक परिसराची रेकी करून दरोडा टाकला होता. बँकेत दोघे दरोडा टाकत असताना बाकीचे साथीदार बाहेर पहारा देत होते, असेही तपासात समोर आले आहे. गुन्हा घडल्यानंतर बँकेतील व परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. त्याद्वारेच गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे समजते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper