- मित्र-नातलगांसोबतची चॅटिंग ‘सेफ’
- बदल फक्त बिजनेस अकाऊंटसाठी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे व्हॉट्सअॅपवर जगभरातून टीका होत असल्याने कंपनीने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबीयांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपने ट्विटसोबतच आपल्या ब्लॉगची एक लिंकही शेअर केली आहे. यामध्ये फेसबूक कंपनी व्हॉट्सअॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअर केली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणार्या व्हॉट्सअॅपने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या. त्यामुळे व्हॉट्सअॅपविरोधात गदारोळ सुरू झालाय. नवीन प्रायव्हसी पॉलिसी जर तुम्ही अमान्य केल्या तर तुमचे अकाऊंट डिलीट केले जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. यावर अखेर कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
कंपनी म्हणते…
- व्हॉट्सअॅप तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.
- व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.
- व्हॉट्सअॅप तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
- व्हॉट्सअॅप तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.
- व्हॉट्सअॅप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.
- तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करू शकतात.
- तुम्ही तुमचा व्हॉट्सअॅप डेटा डाउनलोड करु शकतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper