नागोठणे : प्रतिनिधी
सतत होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद तसेच मुरूड येथील प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत असल्याच्या निषेधार्थ नागोठणे विभाग सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सोमवारी (दि. 2) शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के प्रतिसाद लाभला.
मुरूड येथील चंदन जैन यांचा काही दिवसांपूर्वी अकस्मित मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर या संदर्भात सकल हिंदू बांधव समाज नागोठणे पंचक्रोशी यांनी रायगड पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरूड येथील चंदन जैन यांना स्नायूंचा आजार होता. आरोपी मंजर महमदअली जुईकर (रा. नागोठणे) व चंदन जैन यांची पत्नी पायल हे चंदन यांना झोपेच्या गोळ्या देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. याबाबत चंदन यांची बहीण पुष्पा गांधी यांनी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी मंजर जुईकर व पायल जैन यांच्यात झालेला मोबाईलवरील संवाद, संपर्क तसेच गुगलवर सर्च केलेले झोपेच्या गोळ्यांचे परिणाम, मृताचे पोस्टमार्टम होणार नाही याविषयी झालेला संवाद आदी अनेक पुरावेही त्यांना मिळाल्याचे गांधी यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपी मंजर जुईकरने नागोठणे पंचक्रोशीतील हिंदू मुलीशी विवाह केला होता व त्यांना दोन अपत्येही आहेत. त्यानंतर मंजरने मुरूड येथील चंदन जैन यांचा संपत्तीसाठी खून केला. आरोपी मंजरची पार्श्वभूमी ही गुंडगिरी आणि अरेरावीपणाची आहे हे आम्हा नागोठणेवासीयांना अनेकांना अनुभवास आलेले आहे.
पोलिसांकडून आरोपींवर लावण्यात आलेले 304 व 34 हे कलम सौम्य असून त्यांच्यावर मनुष्यवधाचे 302 व 328 हे कलम लावून तत्काळ अटक करावी व कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी. आरोपी मोकाट सुटल्यास आपले गुन्हे लपविण्यासाठी इतरांना धोका पोहचविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात म्हटले असून याच्या निषेधार्थ आम्ही स्वयंस्फूर्तीने आमची दुकाने बंद ठेवत असल्याचे बोलताना सांगितले.
दरम्यान, बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद शांततेत पाळला गेला.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper