Breaking News

नागोठण्यात वादळी पावसाचे थैमान

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत असतानाच बुधवारी (दि. 29) सायंकाळी सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह पावसाने शहरात प्रवेश केल्याने सर्व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळी पावसाने शहरातील सर्वच भागांत नुकसान केले असून यादरम्यान खंडित झालेला विद्युत पुरवठा गुरुवारी दुपारनंतर शहरातील काही भागात पूर्ववत करण्यात विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना यश आले. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने शहरातील अनेक झाडे कोलमडून आडवी झाली, तर अनेकांच्या घरावरील तसेच इमारतीच्या गच्चीत टाकण्यात आलेल्या शेडचे पत्रे वार्‍याच्या वेगाने उडून गेले. अनेक ठिकाणी विद्युत खांबसुद्धा तारांसह खाली पडल्याने विद्युत वितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी रात्रभर केलेल्या अथक परिश्रमानंतर दुपारी बारानंतर शहरातील काही भागांत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात पथकाला यश आले. या वादळात साधारणतः 300 नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरासह विभागातील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेघर आणि वेलशेत तसेच वरवठणे ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्येसुद्धा नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन आणि सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सकाळी रोहे तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे केलेल्या मागणीप्रमाणे तहसीलदार कविता जाधव यांच्या आदेशानुसार नागोठणे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठीवर्गाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावयास सुरुवात करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply