Breaking News

नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे -ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे

खारघरच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्त
नाटक म्हणजे केवळ नाटकात काम करणे नसते, तर त्यामधून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी येथे केले.
पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जून ते 7 जुलै असे आठ दिवस अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप समारंभ गुरुवारी (दि. 10) पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. त्या वेळी रंगकर्मी भुरे बोलत होते.
समारोप समारंभास अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, नाट्य परिषद कार्यवाह श्यामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, स्मिता गांधी, गणेश जगताप,रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूलच्या समन्वयक चष्मिंदर बक्षी आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात पनवेल महापालिका ही सर्व घटकातील, सर्व स्तरावरील लोकांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे हे अभिनय प्रशिक्षण शिबिर असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने यांनी या वेळी सांगितले.
या शिबिरास पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रंगकर्मीनी उत्तम प्रतिसाद मिळाला हे अभिनय शिबिर ज्युनिअरचे दोन व सिनिअरचा एक अशा तीन गटात घेण्यात आले. या तीनही गटात मिळून 101 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 आणि सायंकाळी 5 ते 8 अशा तीन टप्प्यात आठ दिवस हे अभिनय शिबिर घेण्यात आले.
शिबिरात सात मान्यवरांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना मिळाले. यात प्रामुख्याने जेष्ठ नाट्यकर्मी संतोष बोंदरे अलिबाग, ज्योती आर्य, एनएसडी दिल्ली, धनंजय सरदेशपांडे (महाराष्ट्राची हास्य जत्रा) तसेच अभिनय प्रशिक्षक अशोक केंद्रे, अभिनेता संकेत खेडकर, रवि धुताडमल, डॉ. पाटोदकर यांचा समावेश होता.
या वेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी एक गीत व चार लघु नाटिका सादर केल्या. बालगटातर्फे सादर करण्यात आलेल्या अदिम्बाच्या बेटावर, मानवाची उत्क्रांती तसेच वरिष्ठ ज्येष्ठ गटातर्फे टेन्शन टेन्शन व थांबा आणि विचार करा या लघुनाटकांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्यामनाथ पुंडे यांनी मानले. समारोप समारंभाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक तसेच खारघर पनवेल परिसरातील नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यक्तिमत्व अधिक खुलवण्यासाठी अभिनय प्रशिक्षण उपयुक्त -परेश ठाकूर
व्यक्तिमत्व अधिक खुलवण्यासाठी, प्रभावी होण्यासाठी अभिनय प्रशिक्षण निश्चित उपयुक्त ठरते. दैनंदिन जीवनातही आपण अभिनयाचा चांगला उपयोग करू शकतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी मार्गदर्शन करताना केले. महापालिका या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत पोहोचते हा संदेश लोकांपर्यंत सकारात्मकरित्या गेला आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, असेही ते म्हणाले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply