Breaking News

नायक नहीं, खलनायक ; हू मै…चा पुढचा भाग

नाना पाटेकर खलनायक म्हणून पहायला आवडले असते ना? त्याचं व्यक्तिमत्व, रोखून बघणे, रोखठोक बोलणे अशा भूमिकेला एकदम साजेसे. अहो, निर्माता व दिग्दर्शक सुभाष घईने त्याचीच निवड केली होती. सौदागर (1991) यशानंतर सुभाष घईने वेगळ्या प्रवाहातील (तरी व्यावसायिक. उगाच पैसे कशाला खर्च करा. चित्रपट निर्मितीतील पैसा वसूल झालाच पाहिजे.) असा खलनायक चित्रपट निर्माण करायचा निर्णय घेतला. नाना पाटेकर केंद्रस्थानी हे पक्के केले. त्यानुसार सुभाष घई व नाना पाटेकर यांच्यात स्टोरी सिटींग सुरू झाल्या. तब्बल तीन चित्रपटांसाठी (विधाता, कर्मा व सौदागर) दिलीपकुमारला दिग्दर्शन केलेल्या आणि एव्हाना शोमन म्हणून बिरुद प्राप्त केलेल्या सुभाष घईसाठी नाना पाटेकरसोबत चित्रपट करणे तसे कदाचित फार कसोटीचे वाटले नसेल. अथवा जमून जाईल असा आत्मविश्वास असेल. सुभाष घई दिग्दर्शित चित्रपटांतून आपणास छोटीशी तरी भूमिका मिळावी म्हणून इच्छुक असणारे लहान मोठे कलाकार अनेक, पण नाना पाटेकर तसा नव्हता. दिग्दर्शकाच्या मोठेपणाचा आपल्यावर कसलाही दबाव येऊ न देण्यात ख्यातनाम. प्रसंगी स्पष्टवक्ता, सडेतोड, कारण
नाणे खणखणीत.
तीन चार स्टोरी सिटींग/मिटींगनंतर सुभाष घईच्या लक्षात आले, नाना पाटेकरसोबत आपण चित्रपट करण्याचा विचार सोडून द्यावा. येथेही दिग्दर्शक दिसतो म्हणायचे. सुभाष घई अनेक वळणे घेत घेत घडलेला फिल्मवाला आहे. त्याने निर्णय घेतला. चित्रपटाचे नाव खलनायक असेच ठेवायचे, पण पटकथेत बरेच फेरफार करायचे. पटकथाकार राम केळकर व सचिन भौमिक हे सुभाष घई दिग्दर्शित चित्रपटांचे हुकमी पटकथाकार. त्यांनी पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट हा फोकस ठेवून खलनायक लिहिला. सुभाष घईने राखी गुलजार, संजय दत्त, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, रमय्या, प्रमोद माऊथो, मंगल धिल्लॉन असे अनेक कलाकार निवडून ‘खलनायक’च्या चित्रीकरणास सुरुवात केली. याच रमय्याला कालांतराने आपण बाहुबलीमध्ये पाहिले. सुभाष घईने याच बहुचर्चित खलनायकचा पुढचा भाग खलनायक 2च्या निर्मितीची घोषणा केली यानिमित्त हा फ्लॅशबॅक. त्या काळात सुभाष घई व नाना पाटेकर भेटीचा किस्सा खूप गाजला.
खलनायकमधील संजय दत्त व माधुरी दीक्षित ही जोडी विशेष भूमिकेत कायम ठेवून अनेक नवीन कलाकारांची निवड करीत हा खलनायक 2 निर्माण होईल. सुभाष घईच्याच व्हिसलिंग वूड या चित्रपट प्रशिक्षण केंद्रातून शिक्षण घेतलेल्या नवीन चेहर्‍यांना या चित्रपटात संधी मिळाल्यास आश्चर्य नाही. आपल्याकडे शिकलेल्या कलाकारांसाठी आपणच चित्रपट निर्मिती करायला हवी ही भूमिका व भावना अगदी स्वाभाविकच. खलनायक घोषणेपासूनच गाजला. ते अगदी प्रदर्शित होईपर्यंत तो चर्चेतच होता. एखाद्या चित्रपटाच्या कुंडलीत असे काहीही असू शकते. ते फिल्मी ज्योतिषी सांगू शकत नाहीत.
चित्रिकरण सुरू असतानाच संजय दत्त व माधुरी दीक्षितच्या अफेअरची खमंग चर्चा सुरू झाली. माधुरीच्या चाहत्यांना हा आश्चर्याचा धक्काच होता. संजूबाबा विवाहित (त्याची पत्नी रिचा शर्मा तेव्हा अमेरिकेत कॅन्सरग्रस्त होती), त्याच्याकडे माधुरीने आकृष्ट व्हावे? (तेव्हाची त्याची इमेज बेफिकीर अशीच होती.) छे छे काहीतरीच काय असा माधुरीच्या मध्यमवर्गीय चाहत्यांचा प्रामाणिक व आपलेपणाचा सूर होता. गॉसिप्स मॅगझिनमधून काय वाट्टेल ते रंगवून, खुलवून, फुलवून, शिजवून लिहिले जात होते. त्यांचे ते जणू स्वातंत्र्य. आणि त्यालाच भरपूर वाचक.
चित्रपट पूर्ण होत असतानाच खलनायकच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका व ध्वनिफीत प्रकाशित होताच त्याची गाणी गाजू लागली. सुभाष घई हा चित्रपट गीत संगीत व नृत्य यांचा उत्तम कान (ऐकायला चांगली) व दृष्टी (पडद्यावर पाह्यला आकर्षक) असलेला फिल्मवाला. त्यामुळेच त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गाणी कायमच लोकप्रिय. नायक नहीं खलनायक हू गाजू लागले. आजा साजन आजा, ऐसे तेरी याद आती है, देर से आना जल्दी जाना ही गाणीही लोकप्रिय होत गेली. तोच अलका याज्ञिक व इला अरुण यांनी लोकसंगीतावर आधारित चोली के पीछे क्या है गाण्याने वाद निर्माण केला. तसं पाहता 1993 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी वादळी. सतत कसले ना कसले वाद होत होतेच. धाडसी अभिनेत्रींची गॉसिप्स मॅगझिनमधील बिनधास्त (तरी ब्युटीफुल) फोटो सेशन गाजत होती. तेरी पॅन्ट भी सेक्सी (चित्रपट दुलारा) अशी गाणी वाह्यात म्हणून वादग्रस्त ठरत होती. चित्रपटसृष्टी व अंडरवर्ल्ड या नात्यावरुन भडका उडाला होता. चित्रपटसृष्टीची प्रतिमा काळवंडली होती. त्यात चोली के पीछे या गाण्याची भर पडली. यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. राजकीय पक्षांची आंदोलने झाली. असे गाणे म्हणजे सांस्कृतिक पतन असे म्हटले जाऊ लागले आणि याच गढूळ वातावरणात मुंबईतील 12 मार्चच्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला एप्रिल महिन्यात अटक झाली आणि मोठेच चक्रीवादळ निर्माण झाले. खलनायक चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत आले. ते मुद्रित माध्यमांचे दिवस होते. खलनायक चित्रपटाच्या विरोधात त्यात प्रचंड सूर होता. संजय दत्तच्या कारकिर्दीतील हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट होता, पण वाट सोपी नव्हती. चोली के पीछे क्या है गाण्याचा वाद कायम होताच. त्यातच दिग्दर्शक सावनकुमार यांनी याच चित्रपटाशी स्पर्धा करीत खलनायिका हा चित्रपट पूर्ण केलादेखील. एक चित्रपट अनेक गोष्टी असा खेळ रंगला होता.
अतिशय वादळी वार्‍यासह मुंबईत 6 ऑगस्ट रोजी खलनायक (मेन थिएटर मेट्रो) आणि खलनायिका (मेन थिएटर ड्रीमलॅन्ड) प्रदर्शित झाले. आणि व्यावसायिक यशही प्राप्त केले. संजय दत्तवर जनसामान्यांचा प्रचंड रोष आहे असे म्हटले जात होते आणि त्यात काहीही गैर नव्हतेच. तरी खलनायक चित्रपट पहायला चित्रपट रसिकांची गर्दी झाली. त्याच खलनायकचा पुढचा भाग खलनायक 2ची पटकथा सज्ज आहे.
आज आपण पॅन इंडिया चित्रपट युगात आहोत. एका भाषेतील चित्रपट अन्य अनेक भाषेत डब करून जगभरातील अनेक देशांत प्रदर्शित होत आहेत. त्याच वेळेस आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल माध्यमातून स्मार्ट गुन्हेगारी निर्माण झाल्याच्या बातम्या आपण पाहतोय. सुभाष घई खलनायक 2मध्ये हे नवीन जग कसे दाखवणार याची विलक्षण उत्सुकता… 1993चा हिंदी चित्रपट व त्याचा प्रेक्षक आणि 2025चा हिंदी चित्रपट व त्याचा प्रेक्षक यात बराच फरक पडलाय. चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटर्सकडून मल्टीप्लेक्स, ओटीपर्यंत आला आहे याचे सुभाष घईला भान असेलच म्हणा. सुपरहिट चित्रपटाचा पुढचा
भाग एवढाच निर्मितीमागे दृष्टिकोन नसावा. अनेक चित्रपट नेमके तेथेच फसतात… म्हणूनच सावधान!

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply