कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांची गाणी झाली आणि ती गोडी तरुणाईच्या ओठी आली. असं भाग्य काही मोजक्याच कवींच्या नशिबी येतं. ना. धों.च्या कविता रानातल्या, ज्या पध्दतीने दिसतं, ते त्यांनी कवितेतून मांडलं. इथली जमीन, इथला निसर्ग, इथली शेती, इथला राघू, इथल्या ज्वारीतील यौवन. जे दिसलं तसं. त्यांच्या कवितांत शृंगार आहे, प्रेम आहे, भाव आणि सुखाबरोबरच दुःख आहे. म्हणूनच त्यांच्या कविता अनेकांच्या ओठी आहेत. रानातल्या कविता लिहिणार्या या रानकवीला वाढदिवसाच्या ‘रामप्रहर‘ परिवाराकडून शुभेच्छा!
मराठी कवितेत यापूर्वीही निसर्ग होता, पण ना. धों.च्या कवितातील निसर्गात शेती, भावतालची सृष्टी, शेतकरी, तिथल्या प्रतिमा ठळक होऊन आल्या आहेत. कदाचित हे वेगळेपण रसिकांना अधिक भावतं.
लिंबोणीचं लिंबू,
कसं पिठात भरलं
ही आणि दूरच्या रानात- केळीच्या बनात, गडद जांभळी-भरलं आभाळ, मळ्याच्या मळ्यात मैना-नाजूक ऐकली, ही आणि अशा ‘दूरच्या रानात’ या गाण्यांच्या अल्बममधील गाणी मनाला वेड लावतात. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला 50 वर्षे झाली. मराठवाड्याच्या टोकाला, पाळसेखेडे हा आदिवासी परिसर. गावात शाळा नाही. घरात आणि गावात कुणी शिकलेलं नाही. आई-वडील अशिक्षित, मजूर. अशा ठिकाणी राहून आयुष्यभर साहित्य व कविता निर्माण करण्याचं काम ना. धों.नी केलं. निसर्ग व शेतीतली सृष्टी ही एकरुपपणे त्यांच्या कवितेत आली आहे.
गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोश होता
शब्दगंध तू मला बाहुत घ्यावे
या कवितेप्रमाणे शेतीचा, पिकांचा, झाडांचा, इथल्या जीवनाचा एकसंघ भाव त्यांच्या कवितेत दिसतो. निसर्गाचं आणि माणसाचं नातं सजीव होऊन त्यांच्या कवितेत उतरतं. रानातलं सुख-दुःख त्यांच्या कवितांतून येतं व मनाचा ठाव घेऊन जातं. केळीची बाग सुकते तेव्हा शेतकर्याचं मन सुकतं, आयुष्य सुकतं, पण ही बाग बहरते तेव्हा त्या माणसाचं आयुष्य बहरतं, मन बहरतं, हेही आपल्याला त्यांच्या कवितांतून दिसतं.
या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.
शेतकर्यांचा जीव मातीत अडकतो, प्राण शेतीत गुंतल्याचा उलगडा त्यांची कविता करते. त्यांच्या कवितेत शृंगार, प्रेम आहे, असं अनेकांना वाटतं, पण ना. धों. म्हणतात, मी रानात जे दिसतं ते कवितेतून मांडतो. मला शेतातल्या ज्वारीच्या कणसात बहरलेलं यौवन दिसतं, पण एक खरं ना. धों.च्या कवितेत अवीट गोडी आहे, निराळीच तरळता आहे. कृषिसंस्कृतीतल्या त्यांच्या कवितेने मराठी साहित्याला नवा आयाम दिला आहे. त्यांच्या कवितांना गेली 50 वर्षे मोहोळासारखी माणसं चिकटलेली दिसतात. तरुणाई बिलगलेली दिसते. हेच त्यांच्या कवितांचे यश आहे. सर्वार्थाने त्यांच्या कवितांनी अनेकांचे आयुष्य हिरवं केलं आहे.
गेली 57 वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून त्यांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेले आहे. साठोत्तरी मराठी कवितेने आपला चेहरा-मोहरा बदलला. नव्या संवेदनशीलतेची कविता या काळात जन्मास आली. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने ‘नवे कवी नवी कविता’ ही माला सुरू केली. कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा या मालेतील पहिला कवितासंग्रह. दुसरा ना. धों. महानोर यांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह. रान-शिवाराची चैतन्याने ओथंबलेली कविता म्हणून तिचा सर्वत्र बोलबाला झाला.
ना. धों.ची कविता मराठवाड्याच्या मौखिक आणि लिखित परंपरेचे सत्त्व शोषून घेणारी ही कविता कृषिसंस्कृतीमधील कष्टाळू हातांनी जमिनीची निगुतीने मशागत केली आणि दुसरीकडे मराठी कवितेच्या प्रांतात अक्षरसंपन्न क्षितिज तिने निर्माण केले. समकाळातील कवी-कवयित्रींनी तिच्याकडे अवाक् होऊन पाहिले एवढेच नव्हे, तर कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रज यांसारख्या कवींनी तिचे भरभरून कौतुक केले. बा. भ. बोरकर यांनी ‘सत्यकथा’मधून ‘रानातल्या कविते’ला मुक्त मनाने दाद दिली. तिची बलस्थाने अधोरेखित केली. प्रारंभीच्या काळात असा पाठीवरचा हात उमलत्या प्रतिभेला कसा आवश्यक असतो, तो किती पोषक ठरतो हे ना. धों.नी दाखवून दिले.
पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतून
लदबदले
बहर कांचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.
या कवितेतील आत्मभाव, आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी विलोभनीय झालेला आहे.
रान हासे अंकुरातुन चंद्रलेणे सांडले
अन् कुणाचे पाहताना भागलेती डोळुले
लाख प्राणांची रिणाई बोलता ओथंबली
एक भोळी शब्दगाथा आरतीने व्यापली
झेलताना दान ऐसे नम्र झाल्या ओंजळी
मृत्तिकेच्या चंदनाची रेघ भाळी वंदिली
अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो
या ओळीत कविमनातील कृतकृत्यता जाणवते. कवितेवरील निष्ठा जाणवते. यात वास्तव सृष्टीचे भयाण चित्र कवीने उभे केलेले आहे. कविमनातील समाजसन्मुख वृत्ती आणि कारुण्यभाव यांचे दर्शन येथे घडते. त्यांच्या ’प्रार्थना दयाघना’ या संग्रहात तसेच ‘पानझड’ या संग्रहात या वृत्तीचा परिपोष झालेला आढळून येतो. ‘अजिंठा’, ‘गाथा शिवरायाची’, ‘तिची कहाणी’, ‘जगाला प्रेम अर्पावे’ आणि ‘गंगा वाहू दे निर्मळ’ असे त्यांचे अन्य कवितासंग्रह. त्यातील अनुभूतीविश्वही निराळे. ‘पुन्हा कविता’ आणि ‘पुन्हा एकदा कविता’ हे समकालीन कवितांचे दोन प्रातिनिधिक संग्रह त्यांनी संपादित केले आहेत.
‘वही’ या महानोरांच्या कवितासंग्रहात 60 कविता आहेत. काही अपवाद वगळता यातील कविता अल्पाक्षरी आहेत. ‘रानातल्या कविता’ या संग्रहातील कवितांप्रमाणे या संग्रहातील कवितांमध्ये निसर्गानुभूती आणि प्रेमानुभूती यांचे दर्शन घडते. काही कवितांत शृंगारानुभूतीचे दर्शन घडते.
निसर्गानुभूतीचे चित्रण करताना महानोर लिहितात,
रुजे दाणा दाणा
ज्येष्ठाचा महिना
मातीतला
गंध ओला
चौखूर दिशांना
पाखरांचे पंख, आम्हा
आभाळ पुरेना
चित्रमय शैलीत आसमंत व त्यातील विभ्रम रेखाटताना महानोर लिहितात,
बगळ्यांच्या ढवळ्या माळा आभाळ गेल्या
तिच्या लालसर नखात मेंदी गोंदुन ओल्या
निळ्या नितळ डोळ्यांत सारखे नभ भरकटते
दूर नभाच्या पल्याड कुठले गाव नांदते
‘ऐसी कळवळ्याची जाती’मधून आपल्या जीवनप्रवासात आणि काव्यप्रवासात भेटलेल्या ‘माणसां’ची व्यक्तिचित्रे महानोरांनी तन्मयतेने रेखाटली आहेत. त्यांच्या दृष्टीने आयुष्याचा अमृतमहोत्सव हा मागे वळून पाहण्याचा कालखंड आहे. रसिकांच्या दृष्टीने अर्धशतकाहून अधिक काळ मराठी कवितेला या कवीने गर्भश्रीमंत कसे बनविले याचे अवलोकन करण्याचा आहे. कविमन आणि रसिकमन यांची गळामिठी या प्रदीर्घ कालखंडात पडलेली होती.
-योगेश बांडागळे
RamPrahar – The Panvel Daily Paper