कर्जत : प्रतिनिधी
ख्रिसमस, नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नियमांचा भंग करणार्या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सूचित केले आहे.कोरोना अजून पूर्णतः संपलेला नाही. ओमायक्रॉनमुळे चिंतेत वाढ झाली आहे, अशा वेळी विनाकारण नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तीविरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, फार्महाऊस आहेत. त्या ठिकाणी नाताळ, नववर्षाचे स्वागत कार्यक्रम आयोजित केले जातात. महसूल विभाग आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीशिवाय जे कार्यक्रम आयोजित केले जातील त्यावर महसूल विभाग आणि पोलीस ठाण्याची करडी नजर राहणार आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोनही डोस घेतले असतील त्यांनाच कर्जत तालुक्यात प्रवेश दिला जाणार आहे. मास्क बंधनकारक असणार आहे. सामाजिक अंतर पाळले पाहिजे, महसूल विभाग आणि पोलीस ठाण्याची परवानगी घेऊन जे आयोजक कार्यक्रम आयोजित करतील त्यांना वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. जे शासकीय नियमांचे पालन करणार नाहीत त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper