पनवेल मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी
जानेवारीअखेरपर्यंत दररोजच्या कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मोठा दिलासा मिळाला होता, मात्र 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ होत असून पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी 42 रुग्ण वाढले, तसेच उपचाराधीन रुग्णांतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
राज्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णसंख्या घटली होती. यातूनच सर्वसामान्यांसाठी प्रवास खुला करण्यात आला. बंधने अधिक शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. नियम शिथिल झाले असले तरी कोरोना गेलेला नाही. नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सतत हात धुवणे अशा सर्व नियमांचे पालन करीत आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत बिनधास्तपणे विनामास्क फिरतात. सोशल डिस्टन्सिंग फक्त नावापुरता राहिलेला असल्याचे बर्याच ठिकाणी पहावयास मिळते. त्यामुळे या आठवड्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, एका बाजूला गेले काही दिवस कोरोनाचा आलेख उतरता दिसत असतानाच राज्यातील काही भागात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे काळजी घ्या; अन्यथा काठोर निर्णय घ्यावे लागतील असे शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर ही त्रिसूत्री नागरिकांनी पाळली पाहिजे. कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आटोक्यात आलेल्या कोरोनाचे गेल्या आठवड्यापासून पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे नियम आपण जाणतो आहोत, त्यांचे काटेकोर पालन करा. आपण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. आता काळजी घेणे गरजेचे आहे. तरच आपल्याला कोरानाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवता येईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper