पाली ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्तीचा फटका येथील गडकिल्ल्यांनाही बसला असून सुधागड तालुक्यातील महत्त्वाच्या सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील घरांनाही चक्रीवादळाची झळ बसली आहे. सुधागड हा ऐतिहासिक व शिवकालीन किल्ला असल्याने त्याला खूप महत्त्व आहे. किल्ल्यावरील पंत सचिवांचा वाडा, भोराई मंदिर, शिवमंदिर, राजलक्ष्मी मंदिर तसेच इतर ऐतिहासिक वास्तूंचे चक्रीवादळात प्रचंड नुकसान झाले आहे. येथील पत्रे उडून बांधकामही मोडले आहे. खांब कोसळले आहेत. भिंतींची पडझड तसेच वृक्ष उन्मळून पडले आहेत. येथील वस्तू भिजल्या असून इतरही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. गुरेढोरे दगावली आहेत. गडावर राहणार्या काही लोकांचेदेखील नुकसान झाले. या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्निर्माणासाठी बा रायगड परिवार महाराष्ट्रतर्फे व इतर संस्थांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper