Breaking News

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हताश

पोलादपुरात ऊन-पावसाचा खेळ कायम

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस एक-दोन दिवसाआड हजेरी लावत आहे. ऊन- पावसाच्या या खेळात भाताच्या रोपांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने काही भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात पावसाची हजेरी आणि गैरहजेरी शेतकर्‍यांच्या अंगातून घामाच्या धारा काढून नांगरणी सुरू करण्यास भाग पाडत आहे. नांगरताना जमिनीत ओलावा असायला पाहिजे म्हणून रस्त्यालगतच्या पावसाच्या पाण्याचे लोट पीव्हीसी पाइपाचे तुकडे गोळा करून शेतात वळविण्याचा जुगाडही काही शेतकर्‍यांनी केलेला दिसून येत आहे. रात्री पाऊस पडला, तर सकाळी शेतात उतरायचे आणि दुपारी पाऊस पडला तर लगेचच नांगर हाती धरण्याचा मनसुबा आखलेले शेतकरी मेहनतीला सज्ज असल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांशेजारील शेतजमिनी वाहून जाणे, डोंगर उतारावरील शेतजमिनी अथवा दरडी वाहून येणे आणि खालील बाजूच्या शेतजमिनींमध्ये दरडीचा मलबा साठणे, रानडुक्करांच्या कळपांकडून शेतीची नासधूस केली जाणे, अवर्षण काळामुळे दुबार पेरणी करावी लागणे, पाऊस लांबल्याने भातपिकाच्या लोंब्या जमिनीवर कोसळून त्यातून पुन्हा अंकूर फुटण्याच्या घटना होणे, लष्करी अळी आणि किडींची टोळधाड येऊन पिक रातोरात फस्त करणे अशा अनेक वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. याखेरिज, भाताची कापणी उशिरा केल्यास लोंबीच्या टोकाचे चांगले भरलेले दाणे शेतात गळून पडतात. भात कांडपाच्या वेळी कणीचे प्रमाण वाढते. पेंढ्याची प्रत खालावते आणि पेंढा कमी मिळतो. संपूर्ण हंगामात शेतीमध्ये राबूनही हाती काही येत नसल्याने शेतकर्‍यांची मानसिकता खचत जात असल्याचे दिसून आले आहे. भातपिक विमा योजना काढलेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळू शकते, मात्र पोलादपूर तालुक्यातील शेतकरी आजमितीस भातपिक विमा योजनेबाबत सतर्क झाला नसल्याने शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या शासकीय योजना अस्तित्वात येण्याची गरज निर्माण झाली आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply