मुख्यमंत्री पेयजल योजनेला पालकमंत्र्यांकडून तत्त्वतः मान्यता


कर्जत : बातमीदार
नेरळला नवीन पाणी योजना मंजूर करण्यात यावी, यासाठी नेरळ भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून नेरळ वाढीव नळपाणी योजनेला तत्त्वतः मान्यता दिली. नेरळची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, मात्र आजही शहरात 2016मध्ये मुदत संपलेली नळपाणी योजना राबविली जात आहे. परिणामी अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नळपाणी योजना मंजूर करावी, अशी मागणी घेऊन नेरळ शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेतली. त्या वेळी नेरळ वाढीव नळपाणी योजनेला तत्त्वतः मान्यता देण्यात येत आहे. ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी तिला मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. त्या आधी नेरळ भाजपच्या शिष्टमंडळाने भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन नळपाणी योजना सरकारने मंजूर करावी यासाठी मागणी करणारे निवेदन सादर केले होते. सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते मंगेश म्हसकर यांनी नेरळसाठी नवीन नळपाणी योजनेची गरज का आहे? याबद्दल माहिती दिली. या वेळी नेरळ ग्रामपंचायत सदस्य नितेश शाह, माजी सदस्य नरेश पवार, भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, आदिवासी विकास विभागाचे पेण प्रकल्प अधिकारी संजय सावळा, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, भाजप प्रज्ञा प्रकोष्ट कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप वाहतूक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेळके आदी उपस्थित होते.
नेरळ-कळंब रस्त्यावरील मालेगाव-दहिवली येथे उल्हास नदीवर नवीन पूल उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन या वेळी उमरोली जिल्हा परिषद गटाचे भाजप अध्यक्ष केशव तरे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले.
RamPrahar – The Panvel Daily Paper