कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मोडकनगरमध्ये चार ठिकाणी घरफोडी झाली आहे. यातील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही, मात्र एका फ्लॅटमधून सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथील जकात नाका भागात मोडकनगर रहिवासी भाग आहे. तेथे गोपाळ अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रशांत सहदेव फुलसुंदर पत्नीसोबत मुंबई येथे 18 सप्टेंबर रोजी नातेवाइकांकडे गेले होते. तेथे 19 सप्टेंबर रोजी 5 वाजता त्यांना त्यांच्या आईकडून फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फुलसुंदर हे खासगी वाहनाने रात्री नेरळ येथे पोहचले. त्यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरी करण्यात आली होती. घरातील लोखंडी कपाटामध्ये असलेले 60 हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याबाबत प्रशांत फुलसुंदर यांनी नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.मधू अपार्टमेंटमध्येही तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. तेथील बंद असलेल्या फ्लॅटमधून कोणताही ऐवज चोरीला गेला नाही. या फ्लॅटचे मालक मुंबईत राहत असल्याने चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper