कर्जत ः बातमीदार
मुसळधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली मध्य रेल्वेची बदलापूर-कर्जतदरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर न धावलेली रेल्वे वाहतूक लवकरच सुरू होईल. तीन मालगाड्या भरून दगड आणि खडी आणण्यात आली आहे.
शनिवारी रात्रीपासून बरसलेल्या पावसाने शनिवारी पहाटेनंतर मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जतदरम्यानची वाहतूक बंद पडली होती. रविवारी सकाळी मेन लाइनपासून काही अंतरावर वाहणार्या उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी नेरळ आणि शेलू या रेल्वे स्थानकाच्या मधोमध असलेल्या शेलू एसएसपीबी केबिनच्या पुढे गेल्याने नेरळकडील 300 मीटरच्या डाऊन मार्गावरील मातीचा भराव वाहून गेला. त्या ठिकाणी असलेले दगड आणि खडीही मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती. दरम्यान, बंद असलेली उपनगरीय लोकलसेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी या भागात रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने रेल्वेला काम करणे सोपे होत आहे.
वाहून गेलेली माती आणि त्यावर खडी टाकण्याचे काम करून झाल्यानंतर मेन लाइनवरील ट्रॅक उपनगरीय सेवा आणि एक्स्प्रेस गाड्या जाण्यासाठी सुस्थितीत आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे. त्यासाठी एक मालवाहू गाडी वांगणी येथून सोडली जाईल. त्यानंतर उपनगरीय सेवा सुरू करण्याचा निर्णय होईल.
-वाय. पी. सिंग, अभियंता, मध्य रेल्वे
RamPrahar – The Panvel Daily Paper