आयुक्तांचे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील मूळ रहिवाशी असलेल्या दाऊदी बोहरा समाजाचा दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सुटेल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाला बुधवारी (दि. 23) दिले.
पनवेल महापालिका हद्दीतील मूळ रहिवाशी असलेल्या दाऊदी बोहरा समाजाला दफन भूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्या समाजाने सैफुद्दीन बोहरा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिकेत सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेतली. बोहरा समाजाच्या शिष्टमंडळासह स्थायी समितीचे सभापती अॅड. नरेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, बबन मुकादम, हरेश केणी व भाजप खारघरचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली.
या वेळी परेश ठाकूर यांनी दाऊदी बोहरा समाज हा मूळचा पनवेलमधील असल्याने त्यांना दफनभूमी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांना सांगून लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दाऊदी बोहरा समाजाचा पनवेलमधील दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सुटणार असून दफनभूमीसाठी लागणारा भूखंडही उपलब्ध करून देणार असल्याचेे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या वेळी त्यांना सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper